मुंबई - दहावीच्या परीक्षेसोबत इतर वर्गांच्या परीक्षासुद्धा (Exam) सुरू आहेत. या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याच्या अजब फतव्याने शाळांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील लाखो पालकांना मनस्ताप झाला आहे. शिक्षण विभागाने (School Education Department) तातडीने हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे (Anil Bornare) यांनी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काल एक परिपत्रक निर्गमित करून इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेऊन निकाल मे महिन्यात जाहीर करण्याचे आदेश शाळांना दिले आहे. राज्यात अनेक शाळांमध्ये परीक्षा सुरू झाल्या असून, पालकांनी त्याप्रमाणे सुट्टीचे नियोजन करुन गावी जाण्याचे रिझर्वेशन केले आहे. यामध्ये राज्यासह उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यातील पालकांनी आपल्या मूळगावी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे लाखो पालकांना याचा फटका बसणार आहे.
पालकांना मनस्ताप : अनेक शाळांमध्ये नववीच्या परीक्षा सुरू झाल्या असल्याने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्याची सूचना रद्द करावी, अनेक पालकांनी (राज्यासह उत्तर प्रदेश, बिहार व अन्य राज्ये ) मूळगावी जाण्याचे रिझर्व्हेशन केले आहे. त्यामुळे मे महिन्यात निकाल जाहीर करण्याची सूचना रद्द करावी, तो अधिकार शाळांना देऊन शाळांनी केलेल्या नियोजनानुसार एप्रिल महिन्याच्या शेवटी निकाल जाहीर करावा, राज्यात दरवर्षी तीव्र उन्हाळ्याची परिस्थिती बघता शैक्षणिक वर्ष १ मे रोजी समाप्त करून २ मे पासून शाळांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.