मुंबई - १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज शिक्षण संघर्ष संघटनेच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात आले. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत शिक्षकांनी अनेकवेळा आंदोलने केले, परंतु सरकार केवळ सुरू करण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्यापपर्यंत जुन्या पेन्शनचा विचार केला नाही. त्यामुळे अखेर 'करो या मरो' म्हणत राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले आहे.
शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना अस्तित्वात आणली. परंतु त्या पेन्शन योजनेमुळे शिक्षकांवर अन्याय झाला आहे. कारण १९९६ ते ९७ पासून विनाअनुदान तत्त्वावर नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना या पेन्शन योजनेचा काही फायदा होणार नाही. म्हणून १ नोव्हेंबर २००५ अगोदर ज्या शिक्षकांची अनुदानित तुकडीवर सेवाकाळ पूर्ण झालेला आहे. त्यांना जुनी पेन्शन द्यावी, अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेमार्फत आज हजारो शिक्षकांनी उपोषण करत मागणी केली आहे.
आमदार-खासदारांना जुन्या पेन्शन दिल्या जात आहेत आणि मग शिक्षकांबाबत हा अन्याय का? असा प्रश्न सर्व शिक्षक विचारत आहेत. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना वेळोवेळी भेटून शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबद्दल त्यांच्याशी चर्चा व्हायची. त्यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबद्दल लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी काही पूर्ण केले नाही. त्यामुळे नवीन शिक्षण मंत्री अशिष शेलार यांनी याच पावसाळी अधिवेशनात आपला जुन्या पेन्शनचा शिक्षकांचा मुद्दा सोडवावा, अशी मागणी ठेवत शिक्षक उपोषण करत आहेत. शिक्षकांचे हे उपोषण हे अखेरचे उपोषण आहे. यावर सरकारने जुनी पेन्शन द्यायची की नाही, की शिक्षकांचे जीव जाऊन द्यायचे. हे त्यांनीच ठरवावे. जोपर्यंत जुनी पेन्शन शिक्षकांना सरकार लागू करत नाही, तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही, असे शिक्षक संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी सांगितले.