मुंबई - महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मंत्री परब यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री यांचे जवळचे समजले जातात अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि परब यांचे नाव प्रामुख्याने घेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा रविवारी शेवट झाला. त्यानंतर काही तासातच परब यांना इडीची नोटीस आली. या नोटिसीनंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.
कायदेशीर पद्धतीने उत्तर -
मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशाशी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ, असे अनिल परब यांनी सांगितले आहे. आज परब यांनी संजय राऊत यांची सामना कार्यालयात दहा मिनिटे भेट घेतली व घाईघाईत निघून गेले. त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले.
ईडीच्या कार्यालयात भाजपने पदाधिकारी बसवला का ?
ईडीच्या कार्यालयात भाजपने पदाधिकारी बसवला का आहे का, त्यांना कसं माहिती होते कोणाला ईडीची नोटीस जाणार, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राजकारणात काम करणाऱ्यांना अशा प्रकारचे प्रेमपत्र येत असतात. आमच्या घरी देखील अशी नोटिस देण्यात आली होती. शिवसेना अशा नोटीसने कमजोर होणार नाही. तुम्ही आमची चिंता करू नका, असे संजय राऊत म्हणाले.
सत्तेसाठी ते हापापले आहे -
पोलीस दलाला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अनिल परब यांना नोटीस कशी निघू शकते? भाजपला झोप लागत नाही आहे. सत्तेसाठी ते हापापले आहे. भावना गवळी या सत्तेत होत्या. मंत्री होत्या. आता त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. हे बरोबर नाही. जनताच भाजपला चोख उत्तर देईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
नोटीस येणं हे अपेक्षितच होतं -
राणेंना अटक झाल्यानंतर तर ते अपेक्षितच होतं. अनिल परब यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. सूडबुद्धीने हे राजकारण सुरू आहे. याबाबत आता लोकांच्या मनात कसलीच शंका उरली नाही, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले
तुरुंगात बसून एसटीपण चालवू शकतील -
भाजप देखील या घटनेनंतर आक्रमक झाला आहे. त्यांनी याप्रकरणी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजप नेते अवधूत वाघ म्हटले आहे, जर घरी बसून सरकार चालवले जाऊ शकते तर तुरुंगात बसून परब एसटी पण चालवू शकतील. काही शंका? असे ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे.
मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा -
अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. ही आमची मागणी आहे. याचबरोबरत अनिल देशमुख व अनिल परब यांना तुरूगांमध्ये जावेच लागणार आहे, असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले.