मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर ईडीला उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या जामीन अर्जावर आज ईडीने उत्तर सादर केले असून नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी ईडी कडून अटक करण्यात आली होती. तपास यंत्रणे कडून कुठलेही सबळ पुरावे देण्यात आले नसल्याने नवाब मलिक यांच्याकडून जामीन अर्ज दाखल ( Bail application filed by Nawab Malik ) करण्यात आला होता. या याचिकेवर 26 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
26 जुलै रोजी पुढील होणार सुनावणी - नवाब मलिक यांनी केलेला दावा हा निष्फळ असल्याचे देखील ईडीने आपल्या उत्तरात म्हटलेले आहे. तसेच मलिक यांच्या विरोधात तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे असल्याचे देखील ईडीने म्हटलेले आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असल्याने नवाब मलिक यांना जामीन दिल्यास त्याचा परिणाम तपासावर होण्याची देखील शक्यता असल्याचे देखील ईडीने म्हटले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी विक्रीमध्ये मनी लॉन्ड्री आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. आतापर्यंत तपास यंत्रणे कडून कुठलेही सबळ पुरावे दिले नसल्याने जामीन अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे नवाब मलिक यांच्या वतीने अर्जात म्हटले होते. आज या प्रकरणात ई़डीने उत्तर दाखल केले असून नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर 26 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल - मलिक यांनी गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले असा दावा करत हे टेरर फंडिंग असल्याचा आरोपी ईडीने केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. तेव्हापासून म्हणजे पाच महिन्यापासून ते कोठडीमध्येच आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून ईडीने गुरूवारी त्यांच्याविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते. सध्या नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप? - नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Mumbai High Court : मलिक आणि देशमुखांना उच्च न्यायालयाचा झटका; विधानपरिषदेसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली