मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींची वसूली करण्याचा आरोप लावल्यानंतर देशमुख ईडीच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणी ईडीने समन्स बजावून देखील देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. आता या प्रकरणातील कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी देशमुख यांनी काही वेळ द्या, असे आर्जव ट्विटवर केले आहे.
या प्रकरणी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी दोनवेळा छापेमारी केली आहे. तसेच सीबीआय मोर अनिल देशमुख यांची एकदा चौकशी देखील झाली आहे. तर ईडीच्या छापेमारी दरम्यान अनिल देशमुख त्यांच्या वरळीतील निवासस्थानी स्वत: हजर देखील होते. दरम्यान याच प्रकरणात अनिल देशमुख यांना दोन वेळा ईडीने समन्स देखील पाठवला आहे. मात्र दोन्ही वेळेस अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित नव्हते. दरम्यान अनिल देशमुख यांनी मला वेळ द्यावा अशा आशयाचे ट्विट केलं आहे.
राज्याच्या गृहमंत्रीपदी काम केलेले देशमुख तपास यंत्रणांना चौकशीला मदत करीत नाहीत हे चित्र दुर्दैवी आहे. ज्या पध्दतीचे ट्विट ते टाकत आहेत, त्यातून ते मदत करीत असल्याचे सांगत आहेत. पण प्रत्यक्षात ते मदत करीत नाहीत. त्यामुळे तपास यंत्रणांंनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ज्यावेळी ते स्वतः गृहमंत्री होते त्यावेळी एका चॅनलच्या संपादकांना अशी सवलत त्यांनी दिली होती का? लेखी प्रश्न पाठवून उत्तरे मागितली होती का? कोरोना पसरेल म्हणून चौकशीला येऊ नका, अशा सवलती तुम्ही त्यावेळी तुम्ही दिल्या होत्या का? असा सवाल ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक -
महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी पक्षांकडून लावण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप सोबत जुळवून घ्यावं, या अशयाचं पत्र लिहलं होतं. यानंतर अनिल देशमुख यांनी आता कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे येत्या अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा जोरदार गाजणार आहे. एकीकडे ईडीकडून देखमुख यांची चौकशी सुरु असताना उर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीत एक तक्रार दाखल आहे.