मुंबई : रेल्वेमध्ये २०१८ मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना रेल्वे बोर्डाचा मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली. मात्र, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार आहे.
काय आहे प्रकरण : महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती. ही बाब केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज मागवून मुंबईच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. याविषयी प्रसिद्धी पत्र काढले असून त्यामुळे मुंबईच्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. तसेच भारतातीय रेल्वे भरती बोर्डाच्या एकूण 7 हजार 400 उमेदवारांचे प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहे.
दानवेंच्या पुढाकारामुळे 7400 जणांना मिळणार नोकरी : रेल्वे बोर्डाकडून आरआरबीमार्फत गरजेनुसार लोको पायलटची परिक्षा घेतली जाते. त्यानुसार मेन पॕनल व वेटींग लिस्टची नावे जाहिर करण्यात येतात. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी महाराष्ट्रातील या उमेदवारांवर होणारा अन्याय होऊ दिला नाही. आरआरबीच्या मुख्य अधिकाऱ्यां सोबत चर्चा करुन व या विषयाचा सतत पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला. रेल्वे राज्यमंत्री दानवे साहेबांच्या कार्यतत्परतेमुळे मुंबईच्या 448 उमेदवारांसहीत भारतातील आरआरबीच्या एकूण 7 हजार 400 एएलपी वेटींग उमेदवारांचे नोकरीचे काम मार्गी लागत आहे.