मुंबई - महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक 10 जून ( Rajya Sabha Election 2022 ) रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये ( Rajya Sabha Election ncp votes ) सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोने नेते ( Nawab malik ) न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना ( Anil deshmukh ) मतदानाकरिता परवानगी देण्यात येईल का? यावर चर्चा रंगली आहे. परवानगीसाठी सत्र न्यायालयात अर्ज देखील करण्यात आलेला आहे, मात्र कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार महाविकास आघाडीचा हा प्रवास काहीसा खडतर होण्याचे चिन्ह दिसत आहे.
सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे, आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे. विधानसभेत 13 अपक्ष आमदार, तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात अर्ज केला आहे. विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या 54 वर आली आहे. विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या सोमवारी अपक्ष आमदारांची वर्षावर बैठक बोलावली आहे. या बैठकीला किती अपक्ष आमदार उपस्थित राहतात यावर शिवसेनेच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढले असतानाच सर्व पक्षांना स्वपक्षाच्या आमदारांचे एक-एक मतही महत्वाचे बनले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते धोक्यात आली आहेत. कारण राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आजी-माजी मंत्री आणि आमदार सध्या तुरुंगात आहेत. या दोघांनाही मतदान करता येणार की नाही याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही.
लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या नियम क्रमांक 62 (5) नुसार जे आमदार तुरुंगात शिक्षा भोगत असतील किंवा त्यांच्याविरोधातील सुनावणी न्यायप्रविष्ट असेल आणि त्यावेळी ते कारागृहात असतील अथवा संबंधित आमदार पोलीस कोठडीत असताना त्यांना कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. मात्र, न्यायालयाने परवानगी दिल्यास मतदान करता येत असल्याचेही काही घटनांमध्ये दिसून आले आहे, अशी माहिती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिली.
मागच्या काळातही अशा काही घटना घडलेल्या आहेत. फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे तत्कालीन आमदार रमेश कदम आणि छगन भुजबळ हे मतदानासाठी विधीमंडळात आले होते. या ठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे अजित पवार सांगत असलेली निवडणूक ही राष्ट्रपती पदाची निवडणूक होती आणि ती 2017 मध्ये झाली होती. मात्र, 27 एप्रिल 2019 रोजी निवडणूक आयोगाने आपले नियम अद्ययावत करून नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. त्यामुळे मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार की नाही याबद्दल कायदेशीर पेच निर्माण होवू शकतो.
मैदानात कोण कोण?
शिवसेना
- संजय राऊत
- संजय पवार
भाजप
- पीयूष गोयल
- डॉ. अनिल बोंडे
- धनंजय महाडिक
काँग्रेस
- इमरान प्रतापगढी
राष्ट्रवादी
- प्रफुल्ल पटेल
विधानसभेतील संख्याबळ
शिवसेना -54
राष्ट्रवादी-53
काँग्रेसचे -44
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
एमआयएम - 2
प्रहार जनशक्ती पक्ष - 2
कम्युनिस्ट पक्ष - 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
मनसे - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1
जनसुराज्य शक्ती - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
अपक्ष -13
महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार
बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष 2, प्रहार जनशक्ती पक्ष 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 , शेकाप 1, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 1, कम्युनिस्ट पक्ष 1 आणि 8 अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत.
भाजपकडे एकूण 113 आमदार
भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे 113 आमदार आहेत.
निवडणुकीत मतांचे गणित कसे आहे? - सध्या विधानसभेत एकूण 287 आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे 287 सदस्य आहेत. त्यामुळे, एक जागा निवडून येण्यासाठी 41.1 मतांची आवश्यकता आहे. त्यानुसार भाजपकडे 113 मते असल्याने मतांपैकी 84 मतांनी त्यांचे दोन खासदार निवडून येतील. यातून भाजपकडे एकूण 29 मते शिल्लक राहत असल्याने भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी अजून 13 मतांची गरज आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार दिल्यामुळे त्यांच्या दोन्ही जागा सहजपणे निवडून येऊ शकतील तर शिवसेनेचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. तिसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडे 13 मते शिल्लक राहतात. काँग्रेस, राष्ट्रवादीची मिळून 15 मते शिल्लक राहतात. महाविकास आघाडीला 16 इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे.