मुंबई - गोरेगाव पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून स्थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न करता या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
लसीकरण केंद्र सुरु -
कोविड-१९ विषाणू संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत आहे. याचाच एक भाग म्हणून ड्राईव्ह इन अर्थात वाहनांतून येवून, वाहनांत बसूनच पात्र नागरिकांना लस घेण्याची सोय देखील करण्यात येत आहे. गोरेगाव (पूर्व) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ ओबेरॉय मॉल येथे देखील ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ५१ चे नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्या प्रयत्नांतून हे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. स्थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करुन कोणताही समारंभ आयोजित न करता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आतापर्यंत एकूण 35 लाख 81 हजार 674 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 28 लाख 13 हजार 35 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 68 हजार 639 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 5 हजार 140, फ्रंटलाईन वर्कर्सला 3 लाख 62 हजार 893, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 41 हजार 248, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 12 लाख 04 हजार 827 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 4 लाख 63 हजार 512, 1 हजार 468 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 2 हजार 586 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत कोविन अॅपवर नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. कोविन अॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.