मुंबई - ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी सहज, सोपी सुविधा मिळावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाने ड्राइव्ह इन लसीकरण सुविधा आजपासून सुरू केली आहे. कोहिनूर वाहनतळ येथे ही सुविधा उलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, सायंकाळी उशिरापर्यंत संकलित माहितीनुसार एकूण २२७ वाहनांतून आलेल्या ३६५ नागरिकांना या केंद्रावर लस देण्यात आली.
कोविड संसर्ग मुंबईत वाढीस लागल्यानंतर दादर (पश्चिम) परिसरातील जे. के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे जी/उत्तर विभाग कार्यालयाने ड्राइव्ह इन कोविड चाचणी केंद्र सुरू केले होते. या केंद्राच्या माध्यमातून दादर परिसरातील चाचण्यांना वेग देण्यास मोठी मदत झाली होती. त्याच धर्तीवर ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी घेतला. आजपासून हा उपक्रम प्रत्यक्षात सुरू झाला आहे. खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह नेता तथा नगरसेविका विशाखा राऊत, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी ९ वाजता या ड्राइव्ह इन लसीकरण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
वाहनात बसून लसीकरण
कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी रुग्णालयांमध्ये नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. तसेच लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला अर्धा तास निरीक्षणात ठेवण्यात येते. काही प्रसंगी अशी स्थिती ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींना गैरसोयीची ठरु शकते. सध्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मुभा सरकारने दिलेली नाही. त्यामुळे यावर मध्यम मार्ग म्हणून, जी/उत्तर विभागाने ड्राइव्ह इन लसीकरण उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादी थेट वाहनात बसूनच लसीकरण केंद्रामध्ये येतात व लस घेतात.
दोन बुथवर लसीकरण
कोहिनूर वाहनतळावर लसीकरणासाठी एकूण दोन बूथची निर्मिती करण्यात आली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या पात्र नागरिकांनी नोंदणी केली नसेल, तर या ठिकाणी त्यांना नोंदणीची देखील सोय उलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी केल्यानंतर त्यांना या केंद्रावर लस देण्यात येते. वाहनात थांबूनच त्यांचा निरीक्षणाचा कालावधी पूर्ण करण्यात येतो. लस घेण्यासाठी बूथवर किमान ५० वाहने एकाचवेळी रांगेत थांबू शकतील आणि निरीक्षण कालावधी पूर्ण करेपर्यंत किमान १०० वाहने एकाचवेळी थांबू शकतील, इतकी जागा याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निरीक्षण कालावधी दरम्यान काही त्रास वाटला तर संबंधित नागरिक हॉर्न वाजवून इशारा करु शकतात. तसेच वाहनांमध्ये थांबूनच, लसीकरण होत असल्याने गर्दी होत नाही परिणामी कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो.
लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोहिनूर वाहनतळावरील ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रावर दोन सत्रांमध्ये मिळून एकूण ८ डॉक्टर, ७० वॉर्ड बॉय, १८ परिचारिका नेमण्यात आले आहेत. लस साठा पुरेसा उपलब्ध असेल तर दिवसभरात एकूण ५ हजार नागरिकांना लसीकरण करण्याची क्षमता या केंद्रामध्ये आहे, अशी माहिती सहायक आयुक्त दिघावकर यांनी दिली.
हेही वाचा - खा. सुजय विखे रेमडेसिवीर वाटप प्रकरण : राजकीय हेतूसाठी इंजेक्शन वाटप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा