मुंबई : राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमध्ये काय बदल झाले हे जाणून घेण्यासाठी त्याच्या नमुन्यांची तपासणी वेगवेगळ्या जीनोम सीक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये केली जात आहे. या प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या कोरोना विषाणूच्या 361 नमुन्यांपैकी 61 टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे दिसून आले आहे अशी माहिती जीनोम तज्ज्ञांनी दिली आहे.
61 टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत तपासण्यात आलेल्या 361 नमुन्यांपैकी 61 टक्के नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे निदर्शनास आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र एवढ्या कमी प्रमाणातील नमुन्यांवरून म्युटेशन झालेल्या विषाणूचा फैलाव राज्यात झाल्याचे म्हटले जाऊ शकत नाही असेही तज्ज्ञांचे मत आहे. हे 361 नमुने महाराष्ट्रातील जीनोम सीक्वेन्सिंग प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आले आहेत.
चाचण्यांच्या तुलनेत नमुने कमी
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासलेल्या कोरोनाच्या 361 नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे मला सांगण्यात आले. मात्र महाराष्ट्रातील दररोजच्या चाचण्यांचा विचार करता तपासलेल्या नमुन्यांचे हे प्रमाण अतिशय कमी आहे. महाराष्ट्रात दिवसाला सरासरी दोन लाख चाचण्या केल्या जातात. त्यामुळे इतक्या कमी नमुन्यांवरून राज्यात म्युटेशन झालेल्या विषाणूचा प्रसार झाला असे म्हटले जाऊ शकत नाही असे वरिष्ठ जीनोम सीक्वेन्सिंग तज्ज्ञ पीटीआयशी बोलताना म्हणाले.
नमुने गोळा करण्याची पद्धत चूकीची!
स्थानिक संस्था आणि स्थानिक आरोग्य अधिकारी नमुने गोळा करण्यासाठी वापरत असलेल्या पद्धतीविषयीही अलिकडेच चिंता व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा तपासणीसाठी नमुने पाठविण्यास सांगितले गेले तेव्हा नाशिकमधून दहा नमुने पाठविण्यात आले. हे नमुने कसे गोळा केले याची विचारणा केली असता दहा सलग नमुने दिल्याचे त्यांनी सांगितले. ही पद्धत योग्य नाही. नमुने गोळा करण्यासाठी अनियमित पद्धतीचा वापर केला पाहिजे असे त्यांनी अधोरेखित केले. नाशिकच्या बाबतीत बोलायचे झाले तर गोळा झालेले नमुने हे एकाच भागातील तसेच एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे नमुने गोळा करण्यासाठीचे ध्येयच साध्य होण्यात अडचणी येतात असे ते म्हणाले. पीटीआयशी संवाद साधणारे तज्ज्ञ एका जीनोम सीक्वेन्सिंग प्रयोगशाळेत काम करतात.
स्थानिक प्रशासनाला मिळत नाही तपासणी अहवाल!
महाराष्ट्रातील जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा तसेच केंद्रात संवादाचा अभाव असल्याची तक्रार कोरोनाचे नमुने गोळा करणाऱ्या संस्था आणि स्थानिक संस्थांतील अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. यामुळे स्थानिक संस्था आणि राज्य आरोग्य अधिकारी अंधारात राहत असून कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यामुळे अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
माहिती मिळाल्यास उपाययोजनांमध्ये सुधारणा करणे शक्य
आम्ही नियमितपणे जीनोम सीक्वेन्सिंग प्रयोगशाळांना नमुने पाठवत आहोत. मात्र आम्हाला त्यांच्याकडून काहीही माहिती मिळालेली नसल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पाठविलेल्या नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाले आहे की नाही याविषयी अद्यापही आम्हाला काहीही माहिती नाही. जर असे डबल म्युटेशन झाल्याचे निदर्शनास आले तर यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही सुधारित दिशानिर्देश जारी करू शकतो असे ते म्हणाले. केंद्र किंवा संबंधित प्रयोगशाळांकडून याविषयी सातत्याने माहिती देणे गरजेचे असल्याचेही काकाणी म्हणाले. प्रयोगशाळांच्या सदस्यांमध्ये संवादाचा मोठा अभाव असल्याचे आणखी एका वरिष्ठ संशोधकांनी म्हटले आहे. संवादाची प्रक्रिया जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत कोणत्या विषाणूशी लढा सुरू आहे ते कळू शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
डबल म्युटेशन म्हणजे काय
व्हायरस हा पृथ्वीवरील सर्वात लहान लिव्हिंग बिंग्ज आहे. जीवंत राहण्यासाठी तो जेनेटिक्समध्ये बदल करत असतो. व्हायरसमध्ये झालेल्या कोणत्याही मोठ्या बदलाला म्युटेशन म्हटले जाते. सध्या महाराष्ट्रात असलेल्या कोरोना व्हायरसमध्ये दोन मोठे बदल झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असताना हे डबल म्युटेशन आढळून आल्याने या व्हायरसचा प्रसार वाढल्याचे दिसून येत आहे.