मुंबई - विदेशात हातपाय पसरणाऱ्या ओमायक्रोनचे आतापर्यंत संशयित 10 रुग्ण महाराष्ट्रातही सापडले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा विषाणू जास्त हानिकारक नाही. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नका, फक्त आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी जनतेला केले. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
जगात ओमायक्रॉनच्या संशयित रुग्णात 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुमारे 54 देशात त्याचा संसर्ग पसरला आहे. फ्रान्समध्ये प्रतिदिन रुग्ण 40 हजार तर जर्मनीत 50 हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. ऑस्ट्रीयामध्येही मोठी लाट आली आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्या रुग्णांची प्रकृती ठीक आहे. पण, खबरदारीचा उपाय म्हणून टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर अधिक भर दिला आहे. एयरपोर्टवर स्क्रिनिंग अधिक काळजी घेण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले.
आरटीपीआर टेस्ट दर निश्चिती
विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीआर टेस्ट करण्यात येत आहे. राज्यात सध्या 390 रुपये टेस्टिंगचे दर आकारण्याच्या सूचना आहेत. पण, विमानतळावरीन काही नियमांमुळे दर अधिक आहेत. बुधवारी (दि. 8) मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला असून लवकरच दर निश्चिती केली जाईल, असे टोपे म्हणाले. तसेच गुरुवारी (दि. 9) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबत ऑनलाईन बैठक आहे. राज्यातील आरोग्य खात्याचे सचिव, वैद्यकीय अधिकारी आणि स्वतः आरोग्य मंत्री म्हणून मी असेन. दरम्यान, राज्यातील विविध मुद्दे केंद्राकडे मांडू, असे टोपे यांनी सांगितले.
ओमायक्रोन रोखण्यासाठी बूस्टर डोस
ओमायक्रोनचे विषाणू रोखण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणवर भर दिला आहे. सर्वांचे लसीकरण द्यायचे असल्यास 15 वयोगटातील लहान मुलांना ही लस देण्याची मुभा द्यावी. वैद्यकीय कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस द्यावा, अशी केंद्राकडे मागणी केल्याचे टोपे म्हणाले.
हे ही वाचा - Omicron in Mumbai : मुंबईतील दोघांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग, राज्यातील रुग्णांची संख्या 10 वर