मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने रुग्णांसाठी खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याला डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने विरोध करत उद्यापासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे नायर रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - पंढरपूरचे सुप्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आजपासून बंद, नित्य उपासना राहणार सुरु
सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा -
मुंबई महापालिकेचे मुंबई सेंट्रल येथे नायर रुग्णालय आहे. पालिकेच्या मोठया रुग्णालयापैकी सर्वात मोठे रुग्णालय म्हणून नायर रुग्णलयाची ओळख आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्याने रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास डॉक्टरांनी विरोध केला आहे. रुग्णालयातील काही खाटा कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, शिकाऊ डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सक्ती करू नये अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. नायर रुगणल्याच्या डीनसोबत डॉक्टरांची बैठक सुरू असून मागण्या मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान मुराद संघटनेने आपल्या मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून (६ मार्चपासून) सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.
कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 लाख 52 हजार 445 वर -
मुंबईत काल तब्बल 11 हजार 163 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 52 हजार 445 वर पोहोचला आहे. 25 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 776 वर पोहोचला आहे. 5263 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 71 हजार 628 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 68 हजार 052 जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवस इतका आहे. दरम्यान मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 74 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 700 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 42 लाख 69 हजार 175 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोना अपडेट : गेल्या २४ तासांमध्ये देशात १ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; ४७८ बळी