मुंबई - शववाहिनीमध्ये कर्मचारी नसल्याने डॉक्टर मुलाला मित्राच्या मदतीने पीपीई किट घालून आपल्या डॉक्टर वडिलांचा मृतदेह उचलावा लागला. ही घटना घाटकोपर पश्चिम येथील असून मृत डॉक्टरला कोरोना झाला होता.
मुंबईमध्ये गेल्या आठवडाभरात सर्वाधिक रुग्ण घाटकोपरमध्ये आढळून आले आहेत. याच घाटकोपर पश्चिम येथील साईनाथ नगर रोडवरील गणेश नगर परिसरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. भाजपचे स्थानिक खासदार मनोज कोटक, शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका डॉ.अर्चना भालेराव आणि ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या सहकार्याने हिंदूमहासभा हॉस्पिटलमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री या डॉक्टरांना दाखल केले. त्याठिकाणी अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती केअर सेंटरमधून नातेवाईकांना देण्यात आली. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.
वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलांनी रात्री अडीच वाजता महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधून शववाहिनी मागवली. शववाहिनी यायला उशिर असल्याने मुलांनी मध्यरात्री घाटकोपर विभागाच्या "एन' विभाग कार्यालयात कागदोपत्री सोपस्कार पार पाडले. तसेच स्मशानभूमीतील सर्व तयारी करून ठेवली. मात्र पहाटे सहा वाजेपर्यंत शववाहिनी उपलब्ध न झाल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांना संपर्क केला. त्यांनी विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना देवून शववाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानंतर 2 तासांनी सकाळी साडे आठ वाजता शववाहिका आली. मात्र, या शववाहिकेत चालकाशिवाय कुणीच नव्हते. ईद सणामुळे मृतदेह उचलून शववाहिकेत ठेवणे आणि पुढे विद्युत दाहिनीपर्यंत नेण्यासाठी कामगार नव्हते. तासभर कोणी कामगार मिळत नसल्याचे समजल्यावर मृत व्यक्तीची 2 मुले आणि त्यांचा 1 मित्र तसेच चालक यांनी पीपीई किट अंगात घालून वडिलांचा मृतदेह केंद्रातून शववाहिकेत ठेवला. तिथून मग अंत्यसंस्कारासाठी घेवून गेले. त्यानंतर सव्वा दहा वाजता त्यांच्यावर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार केले.