मुंबई - एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात १.२५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आपल्या कुटुंबीयांबद्दल प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर बंदी यावी अशी मागणीही ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांवर आरोपांचा सपाटाच लावला आहे. समीर वानखेडे व त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अर्शद शेख हे ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील आहेत. उद्या (दि.08) सोमवारी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
समीर वानखेडे, त्यांची बहिण यास्मिन वानखेडे, वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या विरोधात खंडणी वसूल केल्याचा, खोटे जात प्रमाणपत्र सादर करुन फर्जीवाडा केल्याचा आरोप करत आहेत. तसेच त्यांनी वानखेडेंचे बर्थ सर्टिफिकेट, त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो, निकाहनामा त्यांचे काही कौटुंबीक फोटो प्रसिद्ध केले आहेत.
त्यावर ज्ञानदेव वानखेडे आणि कुटुंबायांनी देखील पत्रकार परिषद घेत मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र आता त्यांनी मलिकांविरोधात थेट मैदानात उडी घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. वकील अर्शद शेख यांच्यामार्फत हा दावा दाखल करण्यात आला आहे. शेख म्हणाले की मंत्री मलिक हे वानखेडे कुटुंबाला फसवणूक आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, विविध माध्यमातून टीका करत आहेत. त्यामुळे ते त्यांना थांबायचे आदेश द्यावेत अशी मागणी वानखडे यांनी न्यायालयाकडे केली आहे.