मुंबई - राज्यात शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाने भाजपासोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. या सत्तांतरानंतर विधानसभेतील चित्र पालटले असून विरोधीपक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत, तर उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी वर्णी लागली आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नेत्याला विरोधीपक्ष नेत्याचा ( Leader of Opposition in Legislative Council ) मान मिळाला आहे. विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते पदावर चर्चा सुरू असून पदावर आपला दावा सांगितला आहे.
'शिवसेनेचा विरोधीपक्ष नेते पदावर दावा' : विधान परिषदेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपा पाठोपाठ शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक आहे. घटक पक्षांच्या निर्णयानुसार सर्वाधिक संख्याबळ असल्याने शिवसेनेलाच विरोधीपक्ष नेते पदाचा मान मिळावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. आमचा या पक्षनेते पदावर दावा आहे, असे शिवसेनेचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी सांगितले आहे.
'विरोधीपक्ष नेते पदावर शिवसेनेचाच हक्क' : दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विचारले असता या पदावर सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेचाच हक्क आहे ,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधीपक्ष नेत्याला महाविकास आघाडी म्हणून आमचा पाठिंबा असेल, असेही खडसे यांनी सांगितले.
विधानपरिषदेत पक्षनिहाय संख्याबळ
भारतीय जनता पक्ष - २४
शिवसेना - १२
राष्ट्रवादी काँग्रेस - १०
काँग्रेस - १०
शेतकरी कामगार पक्ष - १
लोक भारती - १
राष्ट्रीय समाज पक्ष - १
अपक्ष - ४
रिक्त जागा - १५
एकूण. ७८, याप्रमाणे संख्या व सध्या विधान परिषदेत असल्याने शिवसेनेने विरोधीपक्ष नेते पदावर दावा सांगितला असला तरीही काँग्रेस विधान परिषद विरोधीपक्ष नेते पदाचा शर्यतीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी घटक पक्षातच या पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : मनसे होणार का 41 आमदारांचा पक्ष ?