मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन शिक्षणाने झाल्याचे चित्र आहे. मुंबईलगत असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण अजूनही पोहोचले नाही. एकीकडे पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य असल्याने दोन वेळच्या जेवणाची गरज भागवणे कठीण असताना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने आणायची कुठून, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. परंतु यावर दिगंत स्वराज फाउंडेशन या संस्थेने नामी उपाय शोधलाय. शिक्षण देण्यासाठी त्यांनी 'बोलकी शाळा' नावाचा एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. काही दिवसांतच ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकही नीट मिळाली नव्हती, त्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शिकण्याची गोडी लावली. आज या प्रयोगाची दखल देशभरात घेतली जात आहे.
मोखाडा तालुक्यात अत्यंत दुर्गम भागात असलेल्या दांडवळ या गावातून या बोलक्या शाळेची सुरुवात झाली. आज ही शाळा नाशकातील इगतपुरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत सुरू झाली असून आर्थिक दुर्बल, आदिवासी आणि मागास विद्यार्थ्यांना ती वरदान ठरत आहे. मुंबईतील काळाचौकी येथे मागील काही वर्षांपूर्वी दिगंत स्वराज फाऊंडेशनची सुरुवात झाली. या फाउंडेशनने कोरोना आणि त्यानंतर दुर्गम, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा अत्यंत नवा आणि प्रभावशाली पर्याय सुरू केला आहे. हा पर्याय आहे बोलकी शाळा. ही शाळा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एका लाऊडस्पीकरवर विद्यार्थ्यांना त्यांच्या दुर्गम भागात असलेल्या गावांमध्ये एकत्र केले जाते. विद्यार्थ्यांना स्पीकरच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. हे अत्यंत आनंदी वातावरणात शिकवले जात असल्याने आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची अडचण दूर झाली आहे.
इतकेच नव्हे तर बोलक्या शाळेने उपेक्षित आणि वंचित घटकातील बालकांना शिकण्यासाठी बोलके केले आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेले मोबाईल, इंटरनेट नेटवर्क,अँड्रॉइड मोबाईल आदींना पर्याय समोर आला आहे.पहिली ते सहावी आणि त्यापुढील वर्गांसाठी फाउंडेशनने विविध पुस्तकांचा आणि त्यातील प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करून त्यावर आवाजाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प तयार केले आहेत. सोबतच आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण सहजपणे त्यांना समजेल अशा भाषेत तयार केले आहे. यासाठी त्यांनी अनेक शिक्षक आणि आपले कार्यकर्ते कामाला लावले असून हे कार्यकर्ते दुर्गम भागातील खेड्यापाड्यांमध्ये जाऊन आदिवासी मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या शिक्षणाचा विद्यार्थ्यांना खूप लांब होत असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आपुलकी निर्माण झाली असल्याचे फाउंडेशनचे संचालक राहुल तिवरेकर यांनी सांगितले.
ही बोलकी शाळा आज आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघर जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील पाडे आणि वस्त्यांवर जाऊन पोहोचली असून ज्या ठिकाणी शिक्षकही वेळेत पोहोचू शकत नाहीत आणि सरकारही लक्ष जात नाही, अशा ठिकाणी या शाळेने आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
राज्यात यापूर्वी समर्थन, संघर्ष वाहिनी आणि इतर अनेक संस्था, संघटनानी आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध होत नाही, असे सांगत त्यासाठीच्या सर्व अडचणी सरकारपुढे मांडल्या होत्या. तर सरकारच्या काही अहवालातून वस्तुस्थिती समोर आली होती. परंतु सरकारकडून त्यासाठी योग्य दखल घेण्यात आली नाही. मात्र दिगंत स्वराज फाउंडेशनने नामी उपाय शोधत विविध ठिकाणी स्पीकरच्या माध्यमातून बोलकी शाळा सुरू करून आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याचे तिवरेकर म्हणाले.