मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पक्ष बदलला आहे का? असा मला प्रश्न पडला. असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केले. सरसंघचालकांच्या वक्तव्यावर त्या प्रतिक्रिया देत होत्या.
मंदिर-मशीद वाद काढू नये - सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रोज रोज मंदिर-मशीद वाद काढू नये, असे वक्तव्य भागवत यांनी काल केले. मोहन भागवात चांगले बोलले, पण मला त्यांनी पक्ष बदलला का, असा प्रश्न पडला. मागील केंद्र सरकारच्या काळात घरगुती सिलिंडरचे दर वाढले तेव्हा भाजप नेते आक्रमकपणे आंदोलन करीत होते. आता सिलिंडरचा दर 1300 रुपये झाला आहे. तरीदेखील सत्ताधारी मूग गिळून गप्प आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.
सुषमाजींचा भाजपला विसर - सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या आंदोलनांची आठवण करून दिली. सुषमाजी खूप आक्रमकपणे महागाईविरोधात बोलत असत. भाजपला त्याचा विसर पडला असेल पण मला आजही त्यांचे शब्द आठवतात. तीच भाजपा 1300 रुपयांना सिलिंडर झाल्यवार अवाक्षरही काढत नाही.
आम्ही सर्व काही केलं - भाजपाचे लोक, तुम्ही 60 वर्षे काय केले असा प्रश्न करतात, त्याला सुप्रिया यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, आम्ही सर्व काही केलं. शाळा सुरू केल्या, हॉस्पिटल्स सुरू केली. विकासकामे केली. भाजपच्या काळात मात्र केवळ महागाई गगनाला भिडली.
नोटबंदीने काय साधलं - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मी आदर करते. तथापि, त्यांच्या वक्तव्यातूनच काही प्रश्न निर्माण होतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. अमित शहा म्हणतात की, देशात बनावट नोटांचा सुळसुळाट आहे. तसं असेल तर तुमच्या नोटबंदीने काय साधलं, असा प्रश्न त्यांनी केला. काश्मीरमधील 370 कलम हटविल्यावर सर्वजण काश्मीरमध्ये जातील, असे बोलले जात होते. किती जणांनी तिथे जमीन खरेदी केली? असा प्रश्नही सुळे यांनी विचारला.