मुंबई: अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे दोन्ही राजीनामे नियमात बसत नाहीत, असे सांगत ही बनवाबनवी केली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. मात्र आज तेच राजीनामा अर्ज न्यायालयाने मंजूर करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. यामुळे लटके यांच्यासोबत ठाकरे गटाकडून बनवाबनवी केली जात नसल्याचे उघड झाले आहे.
भाजपकडून ठाकरे गटावर बनवाबनवीचा आरोप अंधेरी विधानसभा मतदार संघातून २०१९ मध्ये रमेश लटके हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. या मतदार संघात पोट निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिका कर्मचारी असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांनी दिलेले राजीनामे अटींवर असल्याने तो मंजूर करण्यात आला नाही. ठाकरे गटाकडून ज्यांनी हे राजीनामे टाईप करून दिले. त्यांनी लटके यांच्यासोबत बनवाबनवी केल्याचा आरोप भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. असाच आरोप भाजपच्या इतर नेत्यांनी केला आहे.
काय आहे बनवाबनवीचा आरोप ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. हे दोन्ही राजीनामे नियमानुसार नाहीत. नियम कोणी पाळली नाही. एक महिन्याची नोटीस देऊन राजीनामे दिले गेले नाहीत. पहिला राजीनामा अटीसह होता. दुसरा राजीनामा देऊन एक महिना झालेला नाही. हा गोंधळ कोणी घातला ? असा प्रश्न उपस्थित करत याला भाजपा किंवा प्रशासन जबाबदार नाहीत. त्या आजही कर्मचारी आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रशासनावर दबाव टाकला आहे. ऋतुजा लटके यांना पर्यायी चेहरा समोर आणण्यासाठी बनवाबनवी सुरू आहे असा आरोप शिंदे यांनी केला आहे.
चूकीचे समज पसरवले जातायेत रमेश लटकेंच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबाशी घाणेरड्या पद्धतीनं वागलं जाणार नाही. लटकेंना डावलून दुस-या कुणाला उमेदवारी असे चूकीचे समज पसरवले जात आहेत. हा समज पसरवणं म्हणजे सुसंस्कृतपणा संपवणं आहे. महाराष्ट्राचे राजकारण इतकं गढूळ झाले की बातम्यांच्या चॅनेलचा टिआरपी कोसळलाय. लोकांनी न्यूज चॅनेल सोडून आता सासु सुनांच्या सिरीयल पाहाणं सुरु केले आहे, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले आहेत. अनेकदा निवडणुकीआधी असे सापेक्ष राजीनामे दिले जातात. तसेच नियमानुसार पेमेंट, अधिदान पालिकेकडे जमा केल्यानंतर एका दिवसातही राजीनामा मंजूर केला जाऊ शकतो. राजीनामा मंजूर करण्याकरता इतकी नाटकं का केली ? असा प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.