मुंबई - नागरी वाहतूक संचालनालय अर्थात (डीजीसीए) निकषानुसार भारातीय बनावटीच्या पहिल्या विमानाने यशवी उड्डाण केल्याचा दावा वैमानिक अमोल यादव यांनी केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून यादव यांनी तयार केलेल्या सहा आसनी ‘टीएसी-००३’ या विमानाला डीजीसीएची मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न करत होते. अखेर या मेहनतीला यश मिळाले असल्याचे अमोल यादव यांचे बंधू रश्मीकांत यादव यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.
डीजीसीएने या विमानाला मान्यता देण्यासाठी काही निकष पूर्ण करण्याचे बंधन घातले होते. त्यानुसार तीन टप्प्यात या विमानाची चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचे इंजिन सलग 24 तास सुरूच ठेवण्याचे, तसेच विमान धावपट्टीवर विशिष्ट वेगाने अंतर पूर्ण करणे. त्याचबरोबर धावपट्टीवर अतिवेगाने विमान चालवणे या चाचण्या भारतीय बनावटीच्या विमानाने पूर्ण केल्या आहेत. तसेच उड्डाण आणि सुरक्षित जमिनीवर उतरण्याचे निकष ही पूर्ण केल्याचे यादव यांनी सांगितले.
वैमानिक अमोल यादव यांनी 2003ला खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. मात्र त्यांना निधीअभावी त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. जेट एअर वेजमध्ये नोकरी करून यादव यांनी निधी जमावला. त्यानंतर 2008साली पुन्हा सहा आसनी विमान आपल्या घरच्या टेरेस वरच त्यांनी बनवायला सुरुवात केली. अखेर 2011 साली हे विमान तयार झाले. मुंबईत 2015 साली पार पडलेल्या 'मेक इन इंडिया' प्रदर्शनात या विमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तत्कालीन संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनीही अमोल यादव यांचे या उल्लेखनीय कर्तृत्वबाबत कौतुक केले होते. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आवश्यक ती मदत यादव यांना देण्याचे मान्य केले होते. त्या नंतर मुख्यमंत्र्यांनी यादव यांना पालघर येथे 105 एकर जमीन या विमान प्रकल्पासाठी देण्याची घोषणा केली होती. यादव आपल्या स्वप्नपूर्तीकडे पुढे जात असतानाच डीजीसीएने अनेक निकष लावल्याने विमानाची मान्यता रेंगाळली होती. आता डीजीसीएचे निकष पूर्ण केल्याने या विमान प्रकल्पाचा पुढील मार्ग मोकळा झाला आहे.