मुंबई - काल देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नाही. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले की, काल अजित पवार व पंतप्रधान इतक्या मनमोकळेपणाने बोलत होते. त्यांनी अजित पवारांची विचारपूस सुद्धा केली. एवढेच नाही तर भाषणात अजितदादांचे नाव नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतः अजित पवारांना सांगितलं की तुम्ही बोला. हे सर्व काही लोकांना पाहावत नाही, म्हणून इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर जाणीवपूर्वक अशाप्रकारे गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. मला असे वाटते की अजित पवारांच्या विरोधात हे षड्यंत्र आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई भाजपाची बैठक - भाजपची आज एक महत्वाची बैठक भाजप प्रदेश कार्यालयांमध्ये झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महासचिव विनोद तावडे त्याचबरोबर इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये रणनीती त्याचबरोबर आढावा घेण्यास संदर्भामध्ये ही बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले आहे.
लोकसभेसाठी सर्व ४८ जागांची तयारी करणार? - प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील लोकसभेत आम्ही ज्या जागा जिंकलो आहोत. त्या व्यतिरिक्त इतर मतदार संघात आमची तयारी सुरू आहे. पुढच्या १८ महिन्याची रणनीती आम्ही आखत आहोत. विशेष करून राज्यात लोकसभेचे ४८ जागी निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी आम्ही करत आहोत.
यंत्रणावर दबाब आणणे चुकीचे - राहुल गांधी यांच्यावर तिकडून होत असलेल्या कारवाईबाबत काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहे. आजही त्यांनी राजभवनावर मोर्चा काढला. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसचे आंदोलन हे चुकीचे आहे. गांधी परिवाराने २ हजार कोटी रुपयांचे असेट जे ट्रान्स्फर केले. त्याची ही चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू असताना काँग्रेस अशा प्रकारचा दबाव आणत आहे, हे चुकीचे आहे.
एमआयएम शिवसेनेची बी टीम - एमआयएमचे इम्तियाज जलील हे पुरते उघडे पडले आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करून त्यांना निवडून आणले आहे. शिवसेनेची एमआयएम ही बी टीम असल्याचे सिद्ध झाल आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्याही उमेदवाराला टार्गेट करून निवडणूक लढवत नाही. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी निवडणूक लढत असते असेही फडणवीस म्हणाले. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात एनडीए जो उमेदवार ठरवेल तो निवडून येणार आहे. राष्ट्रपती पदासंदर्भात शरद पवारांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी तो निर्णय घेतला असावा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सेनेची भरती बंद होणार नाही - सेनेची रेगुलर भरती बंद केली नाही. अग्निपथ हे ॲडिशनल आहे. या योजनेचे स्वागत झाले आहे. ज्यांनी विरोध केला त्यांना असे वाटले की सेनेची जी नेहमीची भरती आहे. ती बंद केली जाणार आहे. पण असे नाही आहे. ज्या तरुणांना वाटत देशासाठी काम करावे. सैन्यामध्ये भरती व्हावे, त्यांच्यासाठी ही योग्य संधी आहे. सैनिकी शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी व रोजगार देण्यासाठी ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.