मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर निर्णय घेण्याचा तडाखा लावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बैठकांचे सत्र सुरू केले. आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील खाते वाटपावर चर्चा झडत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आरोपप्रत्यारोपाचा धुरळा - शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आरोपप्रत्यारोपाचा धुरळा उडत आहे. त्यातच आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे.
मंत्रीपदावरुन आमदारांमध्ये रस्सीखेच - एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचे लवकरच खातेवाटप होणार आहे. यात भाजपला 20 ते 25 मंत्रीपदे तर एकनाथ शिंदे गटाला 10 ते 15 मंत्रीपदे देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र चांगले खाते मिळावे, यासाठी आमदारांची आतापासून चढाओढ सुरू आहे.