मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. तसेच नाना पटोले (Nana Patole) हे नौटंकीबाज आहेत. ते फक्त नौटंकी करत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेसने आज मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.
- काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने-
मोदींनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेसने आज मुंबईमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या निवासस्थानी रोखल्याने त्याचबरोबर इतरही काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याने हे आंदोलन अखेर काँग्रेसने मागे घेतले आहे. दुसरीकडे भाजपचे असंख्य कार्यकर्ते, आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणीस यांच्या शासकीय निवासस्थानी भाजप कार्यकर्ते जमा झाल्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी त्या सर्वांचे आभार मानले व त्याचबरोबर यापुढे सुद्धा काँग्रेसच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला.
- नाना पटोले नौटंकीबाज -
याप्रसंगी आपल्या शासकीय निवासस्थानी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वांचे खूप खूप आभार, तुम्ही सर्व असताना कोणाची हिंमत होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसने या देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. काँग्रेसने देशाची माफी मागावी. नाना पटोले हे नौटंकीबाज आहेत. ते फक्त नौटंकी करत आहेत. परंतु, यापुढे जर पोलिसांचा वापर करून अशा पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्याचबरोबर इथून जाताना सर्व कार्यकर्त्यांनी शांततेने व संयमाने आपापल्या घरी जावे. कोणीही गडबड करू नये, अशी विनंतीही त्यांनी कार्यकर्त्यांना केली.
- काँग्रेसच्या प्रत्येक आंदोलनाला जशास तसे उत्तर देणार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी यासाठी काँग्रेस पूर्णपणे आक्रमक झाली आहे. आजचे आंदोलन जरी तूर्तास मागे घेण्यात आले असले तरी हे आंदोलन यापुढे सुरूच राहणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबईतील रस्त्यावर काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, मंगल प्रभात लोढा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक घेऊन आंदोलनाविषयी चर्चा केली. त्याचबरोबर यापुढे कॉंग्रेसकडून होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला कशा पद्धतीने उत्तर दिले जाईल याची रणनीतीसुद्धा येथे आखण्यात आली.