मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस तत्काळ पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरकार बनवण्यात भाजप सक्षम नसल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. तसेच जनतेचे स्पष्ट बहुमत भाजपलाच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
अजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच अजित पवार यांनी समर्थन काढून घेतल्याने आम्हाला सरकार स्थापनेत अपयश आल्याचे त्यांनी म्हटले. तीन चाकं असलेल सरकार जास्त काळ चालणार नसून, हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
सेनेवर टीका करताना, शिवसेनेचे हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या चरणाशी असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप करणाऱ्यांनी स्वत: मात्र तबेला खरेदी केला, असा घणाघात त्यांनी शरद पवार यांच्यावर केला.
शिवनसेनेकडून कायम न ठरलेल्या गोष्टींचा आग्रह होत असल्याने युती तुटली असून, सेनेच्या हट्टीपणामुळेच हे सर्व घडत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. भाजपची वर्तणूक कायमच तत्त्वाला धरून असल्याचे ते म्हणाले. तसेच 'मातोश्री'तून बाहेर न पडणाऱ्या लोकांनी सत्तेसाठी लाचार होऊन बाहेरच्यांच्या पायऱ्या झिजवल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
पत्रकार परिषदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आम्ही सन्मानाने विरोधात बसणार असून, सक्षम विरोधकाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी म्हटले.