मुंबई - राज्यात मुंबई ही वाहतूक कोंडीमध्ये एका सर्वेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, ही दुर्देवाची बाब आहे. याच वाहतूक कोंडीमुळे अनेक रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्यामुळे आपले प्राण गमवावे लागतात हेही तितकेच दुर्दैव आणि वास्तव आहे. रुग्णवाहिकेला वेळेत पोहोचण्यासाठी मुंबई शहर व उपनगरात येल्लो कॉरिडोअर ही संकल्पना आता पुढे येत आहे.
राज्यामध्ये एखादा अवयव दुसर्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ग्रीन कॅरिडॉर ही योजना आखल्याने काही मिनिटातच रुग्णवाहिका पोहोचली जाते. त्यासाठी पोलीस, विमान सेवेसह सर्वच प्रशासकीय व्यवस्था कामाला लागते. योग्य वेळेत अवयव पोहोचल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. याच ग्रीन कॅरिडॉरच्या धर्तीवर वाहतूक समस्येतुन रुग्णवाहिकेसाठी मार्ग काढण्यासाठी येलो कॅरिडोअर ही संकल्पना आता पुढे येत आहे. ही मागणी राजावाडी घाटकोपर रुग्णालयातील दक्षता कमिटीचे सदस्य प्रकाश वाणी यांनी पोलीस आयुक्त वाहतूक विभागाकडे केली आहे. याची एक प्रत वाणी यांनी परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांना दिली. या निवेदनाचे उपायुक्तांनी स्वागत केले.
काय आहे यलो कॅरिडॉर संकल्पना -
रुग्णालयातील डॉक्टर आपल्या कंट्रोल रूमला एखाद्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी यल्लो कॅरिडॉरची मागणी करतील. याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात येईल. रुग्णालयातुन रुग्णवाहिका निघताना तिच्यासोबत पोलीस वाहन असेल. तसेच पोलीस आपल्या वाहतूक विभागाला रुग्णवाहिका कोठून कोठे जात आहे, याची माहिती देईल. त्यानुसार ही रुग्णवाहिका निघाल्याची माहिती पुढील वाहतूक विभागाला देण्यात येईल. रुग्णवाहिकेला पुढील सिग्नलवर वाहतूक कोंडी झाली असल्यास त्या ठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी वाट मोकळी करून देतील. त्यामुळे ही रुग्णवाहिका वेळत दुसऱ्या रुग्णालयात पोहोचून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होईल. अथवा एखाद्या रुग्णाचा अपघातात अवयव तुटला असल्यास तो परत जोडण्यासाठी वेळ मर्यादा असते. त्या रुग्णास वेळेचा फायदा होईल.