मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हॅरिएन्टचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी 70 टक्के लसीकरण होणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हॅरिएन्टची लागण झालेल्या 21 पैकी 20 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे सांगताना चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लसीकरण हाच पर्याय
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी किमान 70 टक्के लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लसीकरण केले तरच संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका नागरिकांना बसणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले तरच संभाव्य तिसरी लाट रोखता येईल, असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबाबत हलगर्जीपणा करून चालणार नाही. राज्यात प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये लसीकरण व्हावे यासाठी आरोग्य विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचेही टोपे यांनी सांगितले. राज्यात आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी एका विशिष्ट आकडेवारीपर्यंत येऊन ही रुग्णसंख्या थांबली आहे. त्यामुळे नागरिकांनी अजूनही सतर्क राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नागरिकांनी घाबरू नये
डेल्टा प्लस व्हॅरिएन्टच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात चार हजाराहून अधिक नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी केवळ 21 रुग्णांमध्ये हा व्हॅरिएन्ट आढळून आला. त्यापैकी 20 रुग्ण बरे झाले असून, केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असेही आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. एका महिन्यात प्रत्येक जिल्ह्यातून शंभर नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्या नमुन्यांची तपासणी करून नव्या व्हॅरिएन्टचे रुग्ण शोधण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - #Ganeshotsav2021 : राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर; वाचा, नियमावली...