मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गेले वर्षभर लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारपासून (१६ मार्च) १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी झालेल्या सावळ्या गोंधळामुळे १२ केंद्रांवर केवळ १२४ मुलांनीच लस घेतली. यामुळे १२ ते १४ या वयोगटातील मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी थंडा प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.
लहान मुलांचे लसीकरण
मुंबईमध्ये गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू आहे. गेल्या वर्षभरात वयोवृद्ध, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेले, १८ वर्षावरील नागरिक, १५ ते १८ वयातील मुले यांचे टप्प्याटप्याने लसीकरण केले जात आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून १६ मार्च पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात आले. मुंबईमधील १२ केंद्रांवर हे लसीकरण करण्याचे पालिकेने घोषित केले.
१२४ मुलांना लस देण्यात यश
पालिकेने घोषित केलेल्या केंद्रांवर सकाळी ११.३० पासून पालक आपल्या मुलांना घेऊन आले. १२ वाजता सुरू होणारे लसीकरण दुपारी १ वाजेपर्यंत सुरू झाले नव्हते. १२ ते १४ वयोगटातील मुलांचा कोविन अॅपवर स्लॉट मिळत नव्हता. त्यातच लसीकरण करणाऱ्या डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांना १ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे लसीकरणाबाबत सूचना दिल्या जाणार होत्या. या सूचना देण्यासाठी दुपारचे २ वाजले. लहान मुले वैतागली होती. वैतागून काही पालक आणि मुले घरी निघून गेले. यामुळे दिवसभरात केवळ १२४ मुलांनी लस घेतली.
सर्वत्र वेगळा न्याय
पालिकेच्या १२ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार होते. मात्र कोविन अॅपवर स्लॉट मिळत नव्हता. अॅपवर नोंदणी झाल्याशिवाय लस देणे शक्य नाही, नोंदणी झाली नाही तर त्या मुलांना लस दिल्यावरही प्रमाणपत्र मिळणार नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आम्हाला सूचना मिळाल्यावर लसीकरण सुरू केल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे बीकेसी कोविड सेंटर येथे जी मुले आली होती त्यांना जास्त वेळ ताटकळत न ठेवता त्यांचे लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा : Nana Patole on Phone Tapping : रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा मानहाणीचा दावा दाखल करणार - नाना पटोले