मुंबई - कोरोना रुग्णांचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मुंबईत रोज 1200 ते 1700 रुग्ण आढळून येत होते. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. आज मुंबईत नव्याने 1002 रुग्ण आढळून आले असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 32791 वर पोहोचला आहे, तर मुंबईत 39 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1065 वर पोहोचला आहे. मुंबईत आज नव्या आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याने मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
मुंबईमध्ये आज 1002 रुग्ण आढळून आले असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 25 जणांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 28 पुरुष आणि 11 महिला रुग्ण आहेत. मृतांपैकी 4 जणांचे वय 40 वर्षाखाली आहे. 12 जणांचे वय 60 वर्षांवर आहे तर 23 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून आली, त्याचप्रमाणे डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबईतून आज 410 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 8,814 वर पोहोचली आहे.
चाचण्यांबाबत -
मुंबईत 25 मेपर्यंत 7 सरकारी आणि पालिकेच्या 13 खासगी प्रयोगशाळेमार्फत 1 लाख 74 हजार 841 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी आतापर्यंत 18 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात 380 तपासणी शिबिरे घेण्यात आली. त्यात 22 हजार 515 रुग्णांना तपासण्यात आले. आज 5,542 चाचण्यांसाठी नमुने घेण्यात आले, त्यापैकी 392 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्या विभागात रुग्ण आढळून आले आहेत, त्या विभागाला प्रतिबंधित भाग म्हणून घोषित केले जाते. मुंबईत झोपडपट्टी व चाळीत 686 प्रतिबंधित झोन आहेत. तर 2,826 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
केअर सेंटरमधील रुग्ण -
गेल्या 24 तासात अति जोखमीच्या 8,293 लोकांना शोधण्यात आले आहे. कोरोना केअर सेंटर 1 मध्ये अति जोखमीचे 16 हजार 651 रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले अति जोखमीचे संपर्क असलेले 52 हजार 863 रुग्ण कोरोना केअर सेंटर 1 मध्ये दाखल आहेत.