मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या लोकल प्रवासावर निर्बंध आणले आहे. मात्र आज सर्रासपणे बनावट ओळखपत्राच्या आधारावर सामान्य प्रवासी सुद्धा लोकल प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रवाशांवर आळा घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड देण्यात येत आहे. तसेच बनावट ओळखपत्रांंचा आधार घेतलेल्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासी संख्या ३१ लाखावरून १८ लाखाच्या घरात आली आहे.
बनावट ओळखपत्रांवर कारवाई -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद केले होते. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे लाॅकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा नसली तरी अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेकजण बनावट ओळखपत्र तयार करून लोकल प्रवास करत असल्याचे प्रकार समोर आले आहे. परिणामी लाेकलची गर्दी वाढल्याने साेशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजत आहेत. त्यामुळे लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड ओळखपत्र (युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास) देण्यात येत आहे. तसेच लाेकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाेहमार्ग पाेलीस, आरपीएफ जवानांच्या साेबत बाेगस ओळखपत्रावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
१३ लाख प्रवासी घटले-
गेल्या आठवड्यापासून कारवाईचा जाेर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २१ जून राेजी मध्य रेल्वेवर १८ लाख ७९ हजार तर पश्चिम रेल्वे मार्गावरुन १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला हाेता. परंतु आता लाेकलच्या प्रवासी संख्येत घट हाेत आहे. ८ जुलै राेजी मध्य रेल्वेवरून १० लाख ६८ हजार तर पश्चिम रेल्वेवर ८ लाख ७० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. म्हणजेच उपनगरीय रेल्वे मार्गावरुन सुमारे ३१ लाख प्रवासी प्रवास करीत हाेते. त्यांची संख्या आता १८ लाखांवर आली आहे. त्यामुळे १३ लाख प्रवासी संख्या घटली आहे.
प्रवाशांवर कारवाई-
पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते जून दरम्यान बनावट ओळखपत्रावर प्रवास करणाऱ्या ७४० जणांकडून ३ लाख ७ हजारांचा दंड वसुल केला. याशिवाय आरपीएफने बनावट ओळखपत्र दाखविणाऱ्यावर ५२ गुन्हे दाखल केले. तसेच विना तिकिट प्रवास करणाऱ्या ६५ हजार ५८८ प्रवाशांकडून ३ काेटी ३३ लाख १४ हजार १८२ रुपयांचा दंड वसुल केला आहे. मध्य रेल्वेवर जून महिन्यात ६३ हजार ५१० फुकट्या प्रवाशांंना २ काेटी ६२ लाखांचा दंड आकारला आहे. जून महिन्यात बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या १ हजार १९२ प्रवाशांकडून ५ काेटी ९६ लाखांचा दंड वसुल केला आहे. तर २८ एप्रिल ते ३० जून दरम्यान ३ हजार २०८ जणांवर कारवाईकरून १६ लाख रुपये दंड गाेळा केला आहे.
हेही वाचा -राज्यात 'सिग्नल जम्पिंग' प्रकरणात वाढ; मुंबई प्रथम क्रमांकावर