मुंबई - आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपा प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव अर्ज दाखल केला ( Anil Deshmukh Application For Treatment ) आहे. आपल्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यावर न्यायालय आज मंगळवार रोजी निकाल देणार होते मात्र आता पुन्हा न्यायालयाकडून 13 मे रोजी निकाल देण्यात येईल असे सांगण्यात आले ( Decision on Anil Deshmukh Treatment ) आहे.
2 नोव्हेंबर रोजी झाली होती अटक - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून त्यानंतर 12 तास चौकशी केल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती. त्यांनंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. देशमुखांनी सत्र न्यायालयात वैद्यकीय अर्ज दाखल केला आहे. आपल्याला अनेक शारीरिक आजार आहेत. त्यात आपल्या दुखऱ्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र सरकारी जे.जे. रुग्णालयात उपचाराच्या सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे तेथील अपुऱ्या सुविधामुळे खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती देशमुखांनी न्यायालयाकडे स्वत बाजू मांडताना केली होती.
खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगीची मागणी - अनिल देशमुखांच्या अर्जावर सोमवारी न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा देशमुखांना खांदेदुखीचा त्रास असून त्यावर तातडीने शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. तसेच त्यांना हदय विकाराचीही समस्या आहे. दुसरीकडे जे. जे या सरकारी रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्याचे वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात अनुभवी शल्यविशारद कडून त्यांच्यावर स्वखर्चाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी देशमुखांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांच्याकडून करण्यात आली.
ईडीचे म्हणणे जे.जे. रुग्णालयात अद्यावत सुविधा - ईडीकडून अनिल देशमुख यांच्या उपचाराच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला. देशमुखांच्या खांद्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही असा डॉक्टरांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. तसेच गरज भासल्यास जे.जे रुग्णालयातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते कारण जे. जे रुग्णालयातही सर्व अद्ययावत सोयी सुविधा आहेत. असा दावा ईडीच्यावतीने करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आपल्या निकाल राखून ठेवत उद्या जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा - Summer Special Train : मध्य रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! उन्हाळ्यात धावणार ६२६ विशेष ट्रेन