मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच या विषाणूने धारावीमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळे धारावीतील अनेक भाग सील करण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी या ठिकाणी योग्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा कोरोना विषाणूचा मोठ्या प्रादुर्भाव निर्माण होऊ, शकतो. तसेच या गैरसोयीमुळे धारवीकरांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो, अशी चिंता धा.पु.स.चे अध्यक्ष राजेंद्र कोरडे यांनी व्यक्त केली आहे.
कोरडे म्हणाले, मुंबईतील धारावी या भागांमध्ये अनेक विभाग सील करण्यात आलेले आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कामधंदा बंद आसल्यामुळे खाण्यापिण्याची लोकांचे वांदे झाले आहेत. वस्तीत रहात असताना जीवनावश्यक वस्तूंसाठी आणि शौचालयासाठी लोकांना बाहेर जावंच लागतं आहे. त्यामुळे येथे जर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला तर तो रोखणे शक्य नाही. धारावीतील कामगार आणि धारावीकरांना योग्य मदत करायला हवी. जर सरकारने लक्ष दिलं नाही तर वांद्रे, गुजरातमध्ये जे प्रकरण झालं तसेच प्रकरण धारावीतही घडू शकते.
धारावी सारख्या झोपडपट्टी भागात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. धारावीत दाट लोक वस्ती आहे. त्यामुळे संसर्ग टाळणे हे सरकारपुढे आव्हान आहे. त्यासाठी सरकार दारोदारी जाऊन लोकांच्या चाचण्या करत आहे, जंतुनाशक फवारणी करत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात विलगीकरण कक्ष देखील उभारण्यात आलेले आहेत. पण धारावीतील जनता कोरोनाचा प्रादुर्भावाशी लढत असताना त्यांना सरकार ज्या सोयी सुविधा पुरवत आहेत, त्या अपुऱ्या आणि त्रुटी असल्याचेही कोरडे यांनी सांगितले.