मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा 12 तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. २ ते ३ जून या काळात दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ६५ ते ८५ किलोमीटर प्रतितास असा वाऱ्याचा वेग असेल. हा वेग वाढून ३ जून रोजी सकाळी महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ ९० ते ११० किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे हरिहरेश्वर आणि दमन येथे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई हवामान विभागाच्या तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.
दरम्यान, मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार ३ जून रोजी मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही वाढलेला असेल. ३ आणि ४ जून या दिवशी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्याकडे परतावे अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
३ आणि ४ जून रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, असा अंदाज आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.