मुंबई - टाळेबंदीच्या काळातही राज्यामधील सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. राज्यात एकूण सायबर ४५७ गुन्हे दाखल झाले आहे. याप्रकरणी २५० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
समाज माध्यमांवर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, अफवा पसरविण्यासाठी काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.
टाळेबंदीच्याकाळात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आक्षेपार्ह व्हॉटसअप मेसेेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९० गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक शेअरप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.
अन्य सोशल मीडियाचा ऑडिओ क्लिप्स, यु ट्यूबचा गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणात २५० आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स सोशल माध्यमांवरून काढून टाकण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, समाज माध्यमांमध्ये पोस्ट करताना त्यामध्ये आक्षेपार्ह नसल्याची वापरकर्त्याला खात्री करावी लागणार आहे. अन्यथा सायबर गुन्हे प्रकरणी पोलीस कारवाई करू शकतात.