मुंबई - सायबर पोलिसांनी चाईल्ड पोर्नोग्राफीच्या संदर्भात गुन्हेगांरावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून समाज माध्यमांवर अपलोड केले जाणारे फोटो व व्हिडिओही चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी वापरण्यात येतात.
जगभरात इंटरनेटवर जवळपास 4 ते 5 कोटी पोर्नोग्राफी वेबसाईट अस्तित्वात आहेत. यात चाईल्ड पोर्नोग्राफीच्या वेबसाईटचा समावेश जास्त आहे. याचा धोका लक्षात घेता देशात बहुतांश चाईल्ड पोर्नोग्राफी वेबसाईटवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी घालण्यात आलेल्या पोर्नोग्राफी वेबसाईटचा युआरएल व डोमेनचे नाव बदलून पुन्हा अश्लील वेबसाईट सुरू केल्या जात आहेत.
हेही वाचा-मे महिन्यात २८ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप, तर ६७ लाख क्विंटल अन्नधान्याचे वितरण - छगन भुजबळ
सायबर क्राईम विभागाकडून ब्लॅकफेस ऑपरेशन सुरू-
समाज माध्यमांवर शाळकरी व कॉलेजातील विद्यार्थी हौसेने अपलोड करतात. असे काही फोटो किंवा व्हिडिओ काही असामाजिक तत्वांकडून फेरफार (मॉर्फ) करून वापरल्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. राज्याच्या सायबर क्राईम विभागाकडून या संदर्भात कडक कारवाई करीत ऑपरेशन 'ब्लॅकफेस' सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा-'एकास तीन हे भित्रे रडव्यांचे लक्षण; करुन दाखवा, रडून नको', आशिष शेलार यांचा पलटवार
महाराष्ट्रात चाईल्ड पोर्नोग्राफीचे १,६०० हून अधिक गुन्हे
गेल्या काही महिन्यात चाईल्ड पोर्नोग्राफीसारख्या गुन्ह्यात सामील असलेल्या व्यक्तींच्या विरोधात 100 हून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एनसीआरबीच्या ( नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) 2019 च्या अहवालात एकट्या महाराष्ट्रात चाईल्ड पोर्नोग्राफीच्या संदर्भात तब्बल 1 हजार 600 हून अधिक प्रकरण समोर आली आहेत. यात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणे, शेअर करणे, संग्रहित करणे या गुन्हे प्रकरणाचा समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सुमारे 600 गुन्हे नोंदविले आहे. राज्यातील बीड, परभणी, चंद्रपूर व भंडारासारख्या ठिकाणीसुद्धा या संदर्भात गुन्हे नोंदविले गेले आहेत.
सायबर तज्ज्ञ अंकुर पुराणिक म्हणाले, तुम्ही अडचणी येवू शकतील, असे फोटो काढू नका. ते काढल्यानंतर कुठेही शेअर करू नका. ते खासगीत राहत नाहीत. त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. विशेषत: शाळेतील विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. इंटरनेटचे माध्यम खूप वेगवान आहे. काही सेकंदात आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर पसरतात. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. आक्षेपार्ह फोटो काढणे व शेअर करणे हे बेकायदेशीर आहे. कृपया, यापासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे, असे पुराणिक यांनी आवाहन केले.