मुंबई - 'युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई' म्हणजेच मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमातील कट ऑफ मोठ्या प्रमाणात वधारला आहे. तर विज्ञान शाखेतील 'कट ऑफ' ९५ टक्क्यांच्या दरम्यान येऊन पोहोचला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत विज्ञान शाखेतील कट ऑफ वाढल्याने या शाखेतील प्रवेशासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
राज्य शिक्षण मंडळासोबत केंद्रीय मंडळांच्या बारावीच्या परीक्षांचा निकाल यंदा चांगला लागला असून ९० आणि त्याहून अधिक टक्केवारी घेणाऱ्यांची संख्या काही लाखांवर पोहोचल्याने मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील प्रवेशाचा कट ऑफदेखील वाढला आहे.
पदवी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत रामनिरंजन रुईया महाविद्यालयात वाणिज्य शाखेचा प्रवेश कट ऑफ ९६ टक्क्यांहून वर गेला आहे. तर मिठीबाई महाविद्यालयात वाणिज्य ९१ टक्क तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या बीएमएससची कटऑफ ९५ टक्के आणि विज्ञान शाखेचा ९१ टक्के आहे. नरसी मोनजी महाविद्यालयात पदवीच्या विज्ञान शाखेचा कट ऑफ ९२ टक्क्यांवर आलाय. रुईया महाविद्यालयात कला शाखा ९५ टक्के, तर मिठीबाई महाविद्यालयात कला शाखेचा कट ऑफ ९६ टक्के आहे. तसेच केजी सोमैयामध्येही कला शाखेचा कट ऑफ ८८ ते ९८ टक्क्यांदरम्यान आहे.
मुंबई आणि परिसरात मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे कल वाढल्याने अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये कला शाखेची कट ऑफ वाढत आहे. यामुळेच यंदाही या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार कला शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यात सर्व नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'इनहाऊस' कोट्यातून आपले प्रवेश निश्चित केल्याने हा टक्का वाढलाय. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व, पारंपरिक शिक्षणासोबत अल्प कालावधीच्या अभ्यासक्रमांसाठी मिळणारा वेळ, असंख्य नव्या संधी यामुळे हा बदल घडताना दिसत असल्याचे चित्र पहिल्या गुणवत्ता यादीतून समोर आले आहे.