मुंबई - कार्डीलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 22 वर्षीय अचित कुमार याला जामिन देताना न्यायालयाने व्हॉट्सअॅप चॅटबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे. केवळ व्हॉट्सअॅप चॅट्सच्या आधारे आचित कुमार हा आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांना ड्रग्स पुरवित होता असं म्हणू शकत नाही असं विशेष न्यायालयाने म्हटलं आहे.
एनसीबीने आचित कुमार हा ड्रग्स पुरवठादार होता असा दावा केला होता. मात्र तो खरंच ड्रग्सचा पुरवठा करत होता की नाही? याबाबत एनसीबीकडे ठोस पुरावे नाही. पहिला आरोप आर्यन खान याच्यासोबत असलेले व्हॉट्सअॅप चॅट्स वगळता आचित कुमार ड्रग्सबाबतच्या कुठल्या गुन्ह्यात सहभागी होता याबाबत काहीही पुरावे नाहीत. दोन्ही आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला असताना केवळ व्हॉट्सअॅप चॅट्सच्या आधारे आचित कुमार हा आर्यन आणि अरबाजला ड्रग्स पुरवत होता असं म्हणू शकत नाही, असं न्यायालयाने रविवारी जारी केलेल्या आदेशाच्या प्रतमध्ये आहे.
उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना जामीन मंजूर केल्यानंतर दोन दिवसात विशेष न्यायमूर्ती व्ही. व्ही. पाटील यांनी 9 आरोपींना जामीन मंजूर केला. 9 आरोपींपैकी कुमार आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी संबंधित चार अशा पाच जणांच्या जामीन अर्जावर आपल्या तपशीलवार आदेशात न्यायालयाने म्हटले की ते कटाचा भाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. पण यापूर्वी 20 ऑक्टोबर रोजी आर्यन, मर्चंट आणि धमेचा यांना जामीन नाकारताना विशेष न्यायालयाने एनसीबीच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवत आरोपींचे एकमेकांसोबत संबंध असल्याचे मान्य केले होते.
खानच्या फोनवरून व्हॉट्सअॅप चॅट सापडल्याचा दावा करत एनसीबीने कुमारला 2.6 ग्रॅम गांजासह अटक केली होती. त्यात दावा करण्यात आला होता की कुमार हा ड्रग्स पेडलर होता आणि शहरातील गांजा तस्करीच्या नेटवर्क चा भाग होता. एनसीबीकडे या दाव्याचा कुठलाही पुरावा नसताना अशा आरोपामुळे 22 वर्षीय विद्यार्थ्याच्या करीअरवर त्याचा परिणाम होईल असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला होता. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की खटल्याच्यावेळी कटाच्या पैलूचा विचार केला जाईल. पण ड्रग्स घेणे आणि गुन्ह्याचा भाग असणे असं प्रकरण असेल तर एनसीबीने त्याचे प्रथमदर्शी पुरावे सादर करणे गरजेचे आहे.
हेही वाचा - समीर वानखेडे दिल्लीत दाखल; अनुसूचित जाती आयोगासमोर देणार स्पष्टीकरण