मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि लसीकरणाची संख्या वाढल्याने ( Vaccination in Mumbai ) लोकलची प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोनाच्या पूर्वी उपनगरीय लोकल सेवेतून ८० लाख प्रवाशांना प्रवास करत होते. आता तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच उपनगरीय लोकलमध्ये दररोज ६० लाखांच्यावर प्रवाशांचा प्रवास होत आहे.
लोकल प्रवाशांची संख्या ६० वर - वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मार्च ते जून, २०२० या चार महिन्यांच्या काळात उपनगरीय लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर, फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. हळूहळू प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झाली. साधारण १० ते १५ लाख प्रवाशांचा प्रवास होत होता. मात्र, दोन वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असताना लोकलमधील गर्दी वाढू लागली आहे. सध्या सुमारे ६० लाख प्रवाशांचा दररोज प्रवास होत आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरून दररोज सुमारे ३५ लाख तर, पश्चिम रेल्वेवरून सुमारे २५ लाखांच्यावर प्रवाशांचा प्रवास होत आहे. मागील महिन्यात मध्य रेल्वेवरून सुमारे ३०.८४ लाख प्रवासी होते. तर, पश्चिम रेल्वेवर सुमारे २२ ते २४ लाख प्रवाशांची संख्या होती.
'या' कारणामुळे प्रवासी संख्येत वाढ - मुंबईसह संपूर्ण देशात सध्या कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुंबईत पहिल्या डोस घेणाऱ्यांचे प्रमाण १११.३९ टक्के तर, दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९९.०७ टक्के आहे. याशिवाय ठाणे, पनवेल, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महापालिकाकडूनही मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लोकल ट्रेनचा ( Local Train ) प्रवासी संख्याही वाढत जात आहे. कोरोनापूर्व काळात दररोज सरासरी ८० लाख जण रेल्वेने प्रवास करत होते हा आकडा ६० लाखांवर पोहोचला आहे.
इतक्या लोकल फेऱ्या - सध्या मध्य रेल्वेवर दररोज एक हजार ८१० लोकल फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवर एक हजार ३७५ लोकल फेऱ्या धावतात. मात्र, गर्दीच्या प्रवाशांना उभे राहण्यासाठी आता जागा राहिलेली नाही. लोकलमध्ये शिरण्यासाठी, सीट पकडण्यासाठी प्रवाशांची दमछाक होऊ लागली आहे. स्थानकावर प्रवाशांची रहदारी वाढली आहे. पीक अव्हरमध्ये धीम्या, जलद लोकलमधील प्रवाशांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे.
अशी मिळाली लोकल प्रवासाची मुभा - मार्च, २०२० पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्र शासनाच्या आग्रहानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या सुविधेसाठी १५ जून, २०२० पासून मर्यादित लोकल सेवा सुरू केली होती. त्यानंतर नवरात्रीमध्ये १७ ऑक्टोबर, २०२० पासून मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना वेळेची मर्यादीत घालून लोकल प्रवासांची परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे २२ एप्रिल, २०२१ पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा एकदा लोकल प्रवासावर बंदी घातली होती. फक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय उपचारासाठी रुग्णाना लोकल प्रवासाची परवानगी होती. त्यानंतर कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहेत.
हेही वाचा - MNS Shivjayanti : मनसेच्या शिवजयंतीत दिसलं हिंदू मुस्लिम ऐक्य, ढोल वाजवणारा सलमान चर्चेत