मुंबई - धावत्या लोकल ट्रेनच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे मोबाइल लंपास करणाऱ्या फटका गँगच्या मुसक्या आवळण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. गेल्या अडीच वर्षात मध्य रेल्वे मार्गावर फटका गँगविरोधात तब्बल ५९७ गुन्हे नोंदवण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मात्र, रेल्वेने केलेल्या तीव्र कारवाईमुळे गेल्या चार महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर फटका गँगविरोधात फक्त एकच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फटका गँगविरोधात तब्बल ५९७ गुन्हे -
मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमधून दररोज 70 लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. लोकल ट्रेनच्या प्रवासात अनेक प्रवासी दरवाजात उभे राहून प्रवास करतात. यादरम्यान अनेकांना मोबाइलवर बोलण्याची सवय असते, तर काही प्रवासी खांद्यावर बॅग लटकवून दरवाजात उभे राहतात. हे हेरून रुळांजवळील खांब किंवा झुडपात लपून बसलेले चोर प्रवाशाच्या हातावर एखाद्या लोखंडी किंवा लाकडी काठीने जोरदार प्रहार करतात. प्रवाशाकडील वस्तू रुळावर पडताच ती लंपास करून चोर पसार होतात. या घटनेमुळे अनेक प्रवाशांचे प्राणही गेले आहे. तर अनेकांना कायमस्वरूपी दिव्यांगता आली आहे. 2019मध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात फटका गँगविरोधात गुन्हांची नोंद झाली आहे. तर 2020 जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचा कालावधीत फटका गँगच्या विरोधात तब्बल 70 गुन्हांची नोंदविण्यात आली होती. म्हणजे प्रत्येक महिन्याला सरासरी 25 गुन्हे फटका गॅंगविरोधात दाखल होत होत्या. त्यामुळे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाची डोके दुःखी वाढली होती. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे मेपर्यंत लोकल बंद राहिल्या. जून २०२० पासून पुन्हा अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाल्या होत्या.
चार महिन्यात फक्त एकच गुन्हा -
मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, जानेवारी ते जूनपर्यंत 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत फटका गॅंगविरोधात दाखल 8 गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या फटका गँगवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळे गेल्या चार महिन्यात फक्त फटका गॅंगविरोधात एकच गुन्हा दाखल झालेला आहे. आमच्या कारवाईला यश आले असून आरोपींची धरपकडही केली जात आहे.
रुळाजवळ 100 जवानांची नियुक्त -
फटका गॅंगच्या मुसक्या आवळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी ज्या परिसरात फटका गॅंग कार्यरत आहे किंवा सतत घटना घडत असतात, अशा 15 रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर पोलिसांची गस्त वाढवली. ज्यामध्ये लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफचे मिळून 100 जवानांना नियुक्त केले आहे. याशिवाय रुळाजवळील झोपड्यांमध्ये वास्तव्य असणारे गुन्हेगार व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली जात आहे. तसेच एखादी संशयित व्यक्ती दिसताच त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली आहे.
या परिसरात होतात घटना -
मध्य रेल्वेवरील वडाळा स्थानक, जीटीबी नगर स्थानक, किंगसर्कल, माहीम, कोपरखैरणे, ऐरोली, रबाळे, कल्याण, कोपर, सॅन्डहस्र्ट रोड स्थानक, डोंबिवली, ठाणे, नाहूर, ठाकुर्ली, पारसी टनेल, कोपरी ब्रिज यासह अन्य काही ठिकाणी फटका गँग कार्यरत आहे. या ठिकाणी फटका गँगविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यामुळे या परिसरात लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. तसेच रेल्वे सुरक्षा दलाकडून नियमित पेट्रोलिंग केली जात आहे.
जनजागृतीची उद्घोषणा -
लोकलमधून प्रवास करताना प्रवासी डब्यातील दरवाजाजवळ उभे राहतात. यात काही प्रवासी मोबाइलवर बोलतात, तर काही जण आपल्याजवळील बॅग बाहेरच्या दिशेने ठेवून प्रवास करतात. अशा प्रकारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका गँगकडून धोका होऊ शकतो आणि त्यामुळे सुरक्षितरीत्या प्रवास करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा लोकलमध्ये केली जाते. विशेष म्हणजे ज्या परिसरात फटका गॅंग आहे, त्या परिसरातून लोकल ट्रेन जात असताना याविषयी उद्घोषणा करुन प्रवाशांना सतर्क केले जात असल्याची माहिती जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली आहे.
फटका गॅंग अशा करतात चोऱ्या -
रेल्वे रूळालगत असलेल्या परिसरात फटका गँगचे सदस्य राहतात. रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या खांबावर या टोळीचे काही सदस्य हातात काठी, रॉड घेऊन खांबाच्या आड लपून बसतात. ट्रेन येताच हे धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांना टार्गेट करून त्यांच्या हातावर काठी किंवा रॉडचा फटका मारून प्रवाशाच्या हातातील वस्तू खाली पाडतात, त्यानंतर खाली उभे असलेले टोळीचे इतर सदस्य खाली पडलेली वस्तू घेऊन पसरा होतात.