मुंबई - नॅशनल क्राइम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालानुसार राज्यात महिलांवर होणार्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2017 ते 2019 अशा तीन वर्षांमध्ये महिलांवरील अत्याचारांमध्ये सलग वाढ झाल्याचे प्रकर्षाने दिसते. 2017मध्ये महाराष्ट्रात 31 हजार 979 महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले होते. हेच प्रमाण 2018मध्ये वाढून तब्बल 35 हजार 497 झाले. तर, 2019मध्ये यात वाढ होत तब्बल 37 हजार 144 वर हा आकडा गेला आहे.
महाराष्ट्रात 2019मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या एकूण गुन्ह्यांमध्ये तब्बल 37 हजार 387 पुरुष आरोपींना अटक करण्यात आलेली असून 6 हजार 162 महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशा प्रकारे तब्बल 43 हजार 549 आरोपींना महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात 2017मध्ये तब्बल 5 हजार 453 महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले असून 2018मध्ये हे प्रमाण वाढून 6 हजार 58 वर गेले होते. मात्र पुन्हा 2019मध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून तब्बल 6 हजार 519 गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आले आहेत.
देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यामध्ये सर्वाधिक गुन्हे राजस्थान आणि त्याखालोखाल उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा क्रमांक येतो. मागील तीन वर्षांपासून राजस्थान आणि उत्तर प्रदेशात महिला अत्याचारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.