मुंबई/नवी दिल्ली - ईडीकडून प्रताप सरनाईक यांना समन्स मिळाले आहे. ईडीकडून फेअरअमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहिण्यात आले असून सापडलेल्या क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागविण्यात आली आहेत. प्रताप सरनाईक यांना 21 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरनाईक यांच्या घरातून पाकिस्तानी नागरिकांचे क्रेडिट कार्ड आढळले होते, ज्याचा पत्ता प्रताप सरनाईक यांच्या घराचा आढळून आला होता, अशी सूत्रांनी माहिती दिली होती. दरम्यान, हे वृत्त खोटे असून पूर्णत: चुकीचे आहे, असे सरनाईक म्हणाले आहेत.
पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड
दिल्लीतून आलेल्या ईडीपथकाने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर ठाण्यातील त्यांच्या घरी ईडीला एका पाकिस्तानी नागरिकाचे क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डचा पत्ता आमदार प्रताप सरनाईक यांच्या घराचा असून सरनाईक यांच्या घरातून सिंधिया दादरास या पाकिस्तानी महिलेच्या नावावरचे क्रेडिट कार्ड आढळून आले आहे. दादरास ही महिला फरहाद दादरास या व्यक्तीची पत्नी असल्याचेही या चौकशीत समोर आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
ईडीने लिहिले बँकेला पत्र
दरम्यान, ईडीकडून फेअरअमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहिण्यात आलेले असून या क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागविण्यात आलेली आहे. या प्रकरणाची चौकशी आता प्रताप सरनाईक यांच्याकडून केली जाणार असून या अगोदरही प्रताप सरनाईक यांची तब्बल पाच तासाहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती.
प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ
गेल्या गुरुवारी प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आवश्यक ती माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याचे सांगितले होते. आता या प्रकरणी क्रेडीट कार्डचे प्रकरण पुढे आल्याने प्रताप सरनाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना सबळ पुरावे मिळाले तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल होऊ शकतो.
...तर कारवाई करणार
मला कोणतीही नोटीस आलेली नाही. जर आलीच तर मी स्वतः हजर होईल. माझ्या घरी पाकिस्तानी क्रेडिट मिळाल्याची बातमी मला कळली. पण ही बातमी चुकीची आहे. असे काहीही झालेले नाही. जो चॅनेल किंवा पेपर अशी खोटी बातमी चालवत असेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे.
काय आहे प्रकरण?
टॉप ग्रुपचा माजी कर्मचारी रमेश अय्यर याने पोलिस तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे, की २०१४ मध्ये एमएमआरडीएसोबत ३५० ते ५०० सेक्युरिटी गार्ड पुरवण्याचा करार करण्यात आला होता. त्यातील सुमारे ७० टक्के सेक्युरिटी गार्ड टॉप ग्रुपने पुरवले होते. यावेळी एमएमआरडीएने दिलेली रक्कम काही खासगी खात्यांत जमा करण्यात आली होती. यात सुमारे १७५ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप अय्यर याने केला आहे.
विहंग सरनाईकला 4 वेळा समन्स
या अगोदर केलेल्या कारवाईदरम्यान प्रताप सरनाईक यांच्या मुंबई व ठाण्यातील घर, कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली होती. ही छापेमारी ईडीच्या दिल्लीतल्या पथकाने केली होती. त्यानंतर ईडी कडून विहंग सरनाईक यांना पाच तास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 3 वेळा विहंग यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र पत्नी आजारी असल्याचे कारण देत विहंग याने चौकशीसाठी हजेरी लावली नव्हती. यानंतर विहंगला समन्स बजावण्यात आलेले नाहीत.
प्रताप सरनाईक यांची ईडी हजेरी
आमदार प्रताप सरनाईक शहराबाहेर असल्यामुळे विहंगने जेव्हा ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली तेव्हा ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी ते दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले होते. मुंबईत परतल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. मंगळवारी (8 डिसेंबर) आमदार प्रताप सरनाईक यांची क्वारंटाइनची मुदत संपली. त्यानंतर त्यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. आता त्यांना २१ डिसेंबरला ईडी ऑफिसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
अमित चंदोले न्यायालयीन कोठडीत
दरम्यान, टॉप सिक्युरिटी ग्रुपचा मालकही अमित चंदोले याला ईडीकडून अटक करण्यात आली होती. एमएमआरडीएला 175 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आलेली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी बजावली. सध्या अमित चंदोले न्यायालयीन कोठडीत आहे.
कोण आहेत प्रताप सरनाईक?
प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. बालपणीच वर्धा जिल्ह्यातून मुंबईला स्थायिक झाले. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबिवलीच्या एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ रिक्षा चालवली. १९९७साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेऊन राजकारणात उडी मारली. १९९७मध्ये ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. २००८मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. २००९मध्ये ते आमदार झाले. ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते तीनदा आमदारपदी निवडून आले आहेत. २०१९च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात त्यांनी १२५ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता दाखवली होती.
दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश राजकारणात
प्रताप सरनाईकांना दोन मुलं आहेत. यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग तर धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे जवळचे संबंधात आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. तर युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. तर पूर्वेश यांच्या पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. विहंग शांतीवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे अनेक रहिवासी प्रकल्प विहंग ग्रुपच्या माध्यमातून ठाणे शहरात उभारण्यात आले आहेत. ठाण्याच्या घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे.