मुंबई - सुप्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधील काही दुकानांना आज (गुरुवारी) सायंकाळी आग लागली. या आगीवर मुंबई अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले असून कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आगीच्या घटना टाळता याव्यात, यासाठी दुकानांसाठी वेगळी गाईडलाईन ठरवण्यात येईल. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दक्षिण मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानांना आग लागली. सुरुवातीला ही आग चार ते पाच दुकानांना लागल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या दुकानात असलेले पुठ्याचे बॉक्स, पॅकिंग मटेरियल, परफ्युम आदी वस्तूंमुळे आग पसरत गेली. मार्केटमधील 12 दुकाने आणि त्यांच्या पोटमाळ्यावर आग पसरली.
आगीत पुठ्याचे बॉक्स, पॅकिंग मटेरियल, इलेक्ट्रिक सामान, वायरिंग जळून खाक झाले आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या ६ फायर वाहन, ५ वॉटर टँकर व १ रेसक्यू वाहनाने घटनास्थळी जाऊन आगीवर 8 वाजून 48 मिनिटांनी नियंत्रण मिळवले. आगीमुळे धूर झाल्याने दुकानांची शटर तोडून आग विझवावी लागली असून आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
अशी असेल नवीन गाईडलाईन....
क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळ, परफ्युम, ड्रायफ्रुट, गिफ्टची दुकाने आहेत. ही दुकाने अगदी दाटीवाटीने आहेत. मार्केटमध्ये ही सर्व दुकाने दाटीवाटीने असल्याने पुठ्ठे, लाकडी सामान यामुळे आग पसरली. यापुढे आग लागू नये म्हणून आग लागतील अशी लाकडाचे पुठ्याचे सामान असलेली व परफ्युम विकणारी एका बाजूला असतील; अशा गाईडलाईन ठरवली जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.