नवी दिल्ली - देशात गेल्या २४ तासांत ३५ हजार ५५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनामुळे ५२६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९५ लाख ३४ हजार ८६४ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ८९ लाख ७३ हजार ३७३ जणांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ६४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्यास्थितीत देशभरात चार लाख २२ हजार ९४३ जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४ .११ टक्क्यांवर गेले आहे, तर मृत्यू होण्याचे प्रमाण १.४५ टक्के इतके झाले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात ५ हजार १८२ नवे कोरोनाबाधित
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये ५ हजार १८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ हजार ६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचा एकूण आकडा १७ लाख ३ हजार २७४ वर पोहचला आहे. राज्यात आज कोरोनामुळे 115 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
कोरोना लस अंतिम टप्प्यात
सर्वांचे लक्ष सध्या कोरोनाच्या लसीकडे लागले आहे. कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असून, या महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला देशात लस उपलब्ध होईल अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की ही लस अत्यंत सुरक्षीत आहे. आतापर्यंतच्या सर्व चाचण्या सकारात्मक झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये पुन्हा संचारबंदी लावण्याचा विचार नाही
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र दिल्लीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असून, दिल्लीमध्ये पुन्हा संचारबंदी लावण्याचा सरकारचा विचार नसल्याचे दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे.
कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा
कर्नाटकात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटकमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा राज्यातील कोरोना सल्लागार समितीने राज्य सरकारला दिला आहे. तसेच कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात संचारबंदी करणे, सार्वजनिक उत्सवांवर बंदी घालने असे उपाय सुचवण्यात आले आहेत.
न्यायालयाने मागवला हिमाचल प्रदेशमधील कोरोना परिस्थितीचा अहवाल
हिमाचल प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याची जनहीत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आता न्यायालयाने हिमाचल प्रदेश सरकारकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा अहवाल मागवला आहे. तसेच रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांबाबत देखील सरकारकडे विचारणा केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे.
आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणी अभावी आरोग्य यंत्रणेवर ताण
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेची पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी झाली नसल्याने, तेथील आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचा दावा राज्यपाल जगदीप धनखर यांनी केला आहे. कोरानाकाळात आयुष्मान भारत योजनेची निर्णायक भूमीका आहे. मात्र असे असताना राज्यात या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.