मुंबई - एनआयने आज मनसुख हिरेन प्रकरणात मोठी कारवाई करत या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने याला एनआयएने पहाटेच्या सुमारास बेड्या ठोकल्या. या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. सुनील माने याला आज कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
आज न्यायालयात काय घडले?
दुपारी दोनच्या सुमारास सुनील मानेला विशेष एनआयए कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी माने यांच्या वकीलाने युक्तीवाद करत जामीन देण्याची मागणी केली. यावेळी माने यांचे वकील म्हणाले, 'सुनील माने पहिल्या दिवसापासून तपासात सहकार्य करत आहे. एनआयएने त्यांना पहाटे अटक केली हे कायद्याने चुकीचे आहे. एनआयएकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच मानेचा गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही. केवळ तांत्रिक पुराव्याच्या आधारावर ही अटक आहे. त्यामुळे मानेंना जामीन देण्यात यावा' असा युक्तिवाद मानेच्या वकिलांनी कोर्टात केला.
एनआयएचा युक्तिवाद -
या युक्तिवादावर एनआयएकडून सांगण्यात आले, की या गुन्ह्यात मानेचा स्पष्ट सहभाग असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. तसेच काही तांत्रिक पुरावे मानेविरोधात आढळून आले आहेत. त्यामुळे ही अटकेची कारवाई करण्यात आली.
मानसिक त्रास देऊ नये -
तर, मानेला मानसिक त्रास देऊ नये आणि दररोज त्याची मेडिकल चाचणी केली जावी, तसेच त्याची एक कॉपी आम्हालाही द्यावी, अशी मागणी मानेच्या वकिलांकडून करण्यात आली. या संपूर्ण युक्तिवादानंतर एनआयए कोर्टाने सुनिल मानेला 28 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
मनसुख हत्याप्रकरणात सुनील मानेचा सहभाग काय?
सुत्रांच्या माहितीनुसार सुनील माने 2 ते 4 मार्चदरम्यान दररोज सीआययू पथकात येत होते. 3 मार्चला जेव्हा मनसुख हिरेन सीआययु पथकात आला होता. त्या बैठकीलाही सुनील माने हजर होते. सुत्रांच्या माहितीनुसार सुनील माने त्या बैठकीत मनसुखवर अँटिलिया स्फोटके प्रकरणात अटक होण्यासाठी दबाव टाकत होते. एनआयएच्या तपासात हेही स्पष्ट झाले होते, की मनसुख अटक होण्यासाठी तयार नसल्याने वाझेंनी सुनील मानेला सांगितले होते. तसेच मनसुखला काही दिवस गायब करू त्यानंतर जे होईल ते पाहता येईल, असेही सांगितले होते.
दरम्यान, मनसुखला हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून सुनील मानेच असल्याचे तपासात समोर आले आहे. सुनील माने यानेच फोन करून मनसुखला हत्येच्या दिवशी बोलावले होते. मनसुखच्या हत्येवेळी माने घटनास्थळी दाखल झाला होता, अशीही माहिती एनआयएने दिली आहे.