मुंबई - मुंबईमध्ये एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसणे, ऑक्सिजन नसणे, पाणी नसणे आदी प्रश्नावर आज राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान आणि रुग्णांनी सहायक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यामुळे पालिका सज्ज असल्याचा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे.
पालिकेचा दावा फोल
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार कमी होत असतानाच कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झालेला आहे. मुंबईत रोज 9 ते 11 हजार रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी पालिकेने आपल्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध केल्या असून खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याचा प्रकार उघड झाला आहे.
रुग्णांना भुर्दंड
पालिकेच्या कुर्ला एल वॉर्डच्या हद्दीत भाभा रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अद्याप आयसीयू सुरू करण्यात आलेले नाही. रुग्णांना पाणी मिळत नाही. रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आल्यास त्याला ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाही. गेले दीड महिना रुग्णालयात औषधे नसल्याने रुग्णांना बाहेरून आर्थिक भुर्दंड सहन करून औषधे विकत घ्यावी लागत आहेत.
ठिय्या आंदोलन
पालिकेने रुग्णालयांना लागणारी औषधे विकत घ्यावीत, असे आदेश दिले आहेत. मात्र कुर्ला भाभा रुग्णालयात औषधे विकत घेतली जात नाहीत. यामुळे रुग्णांचे आणि नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने सहायक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रुग्णांना सोयीसुविधा देण्याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप खान यांनी केला.