मुंबई - राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान केंद्रांची रचना बदलली जात आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार ( corporation election multi-member ward system ) निवडणुका होणार असल्याने ही रचना नव्याने करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक आयोगाने ( election commission ) दिली आहे.
राज्यातील बड्या, छोट्या महानगरपालिका मिळून एकूण 23 महानगरपालिकांची निवडणूक डिसेंबर 2022 अखेर होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये निवडणुका घेताना त्या बहुसदस्य प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्यामुळे एका मतदाराला मतदान करताना एकापेक्षा अधिक मतदान करावे लागणार आहे. मतदारांचा गोंधळ होऊ नये, मतदान केंद्रावर सुटसुटीत पणा, असावा यासाठी आता मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
मुंबई वगळता बहुसदस्यीय निवडणूक पद्धती - राज्य सरकारने महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमात केलेल्या दुरुस्तीनुसार राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांकरिता आता बहुसदस्य प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. मात्र, या पद्धतीमधून मुंबईला वळविण्यात आले असून, मुंबईत एक सदस्य प्रभाग पद्धती सुरू राहणार आहे. त्यामुळे आता एका मतदाराला सरासरी तीन मते द्यावी लागणार आहेत. अधिनियमातील या तरतुदीनुसार मतदाराला मतदान करावे लागणार आहे.
मतदारांची केंद्रनिहाय संख्या - बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रति मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या एक हजार ते बाराशे असणार आहे. यापूर्वी ती बाराशे ते चौदाशे इतकी होती. तर उर्वरित सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रति मतदान केंद्र मतदारांची संख्या 750 ते 800 यापूर्वी होती. आता त्यामध्ये वाढ करण्यात येणार असून, ही संख्या 800 ते 900 मतदार इतकी असणार आहे. याप्रमाणे प्रति मतदान केंद्रानुसार मतदारांची विभागणी करताना कमाल किंवा किमान पेक्षा दहा टक्क्यांपर्यंत फरक आढळल्यास नवे मतदान केंद्र करण्याची आवश्यकता नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान ( election commissioner UPS Madan ) यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका? - राज्यात डिसेंबर 2022 अखेरपर्यंत सुमारे 23 महानगरपालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वसई विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, परभणी, लातूर, भिवंडी निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा भाईंदर आणि नांदेड वाघाळा या महापालिकांचा समावेश आहे.
मुदत संपलेल्या महापालिका? - नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि वसई विरार या महापालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, आणि सोलापूर महानगरपालिकेची मुदत मार्च एप्रिल 2022 मध्ये संपली आहे. तर उर्वरित महापालिकांची मुदत मे ते नोव्हेंबर 2022 या काळातील संपणार आहे. त्यामुळे या सर्व महापालिकांच्या निवडणुकांच्या मतदार संकेत बदल केले जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.
हेही वाचा - शिंदे गट विषारी झाड.. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवसेनेचा घणाघात