मुंबई - कोरोनाचे निदान लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करताना आवाजावरून स्क्रिनिंग करण्याची नवी पध्दती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात या पद्धतीचा अवलंब करत स्क्रिनिंग करत संशयित रुग्ण शोधण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण या पद्धतीवर अभ्यास सुरू असून या अभ्यासाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच ही पद्धत अवलंबली जाणार आहे. त्यानुसार, आवाजाचे नमुने आणि चाचणी अहवाल पाठवण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता यासंबंधीचा अहवाल फेब्रुवारीमध्ये येणार असल्याची माहिती गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंड्राडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
हेही वाचा - 'सरकारचे वर्ष वाया गेले; सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले हे कुचकामी सरकार'
केवळ 30 सेकंदांत स्क्रिनिंग
जगभर कोरोनाने दहशत पसरवली आहे. या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अनेक देश लस तयार करण्याच्या मागे लागले आहेत. मात्र कोणतीही लस येण्यास बराच वेळ लागणार आहे. अशावेळी कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी संशयित रुग्णांना शोधून त्यांची टेस्ट करणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सध्या तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासली जाते. तर, आता या पद्धतीबरोबरच आणखी एक नवीन पध्दती आणण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला. त्यानुसार, अमेरिका आणि इस्रायलमध्ये वापरण्यात येणाऱ्या व्हॉईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात आवाजावरून स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इस्रायलच्या 'व्होकोलिस हेल्थ' या कंपनीशी ऑगस्टमध्ये करार करण्यात आला. या करारानुसार नेस्कोतील रुग्णांच्या आवाजाचे नमुने कंपनीकडे पाठवण्यात येतील आणि यावर अभ्यास करत कंपनी अहवाल देईल. हा अहवाल योग्य आला तर ही पद्धती अवलंबली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही पद्धती अवलंबली गेल्यास केवळ 30 सेकंदांत संशयित रुग्ण शोधता येणार आहे.
4000 आवाजाचे नमुने आणि 500 कोरोना अहवाल सादर
करारानुसार सप्टेंबरमध्ये या अभ्यासाला सुरुवात झाली आहे. नेस्कोतील रुग्णांच्या आवाजाचे नमुने आणि चाचणी अहवाल घेत ते कंपनीला पाठवणे हे काम पहिल्या टप्प्यात होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात त्याचा अभ्यास करत अंतिम अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्लिश या चार भाषांमध्ये रुग्णांच्या आवाजाचे नमुने घेण्याचे पर्याय इस्रायली कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार रुग्णांच्या आवाजाचे 4000 हजार नमुने कंपनीला पाठवण्यात आले आहेत. तर, 500 चाचणी अहवालही सादर करण्यात आल्याची माहिती डॉ. आंड्राडे यांनी दिली आहे.
आता प्रतीक्षा अंतिम अहवालाची
या अभ्यासाच्या सद्यस्थितीबाबत डॉ. आंड्राडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता आम्हाला अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल आला आणि तो व्यवहार्य असेल, सकारात्मक असेल तर, पालिकेकडून ही पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात येईल. ही पद्धती सुरू झाली तर त्याची निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या अभ्यासाचा प्राथमिक अहवाल डिसेंबर अखेरपर्यंत येईल. अंतिम अहवाल फेब्रुवारीमध्ये येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - प्रत्येक कुटुंबाला मास्क अन् सॅनिटायझर वाटपाचे नियोजन तातडीने करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश