मुंबई - कोरोनावर केंद्र सरकारने भारत आणि सिरमच्या दोन लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरू केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात १३ ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतही उद्या लस येणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत कांजूर येथील शीतगृहामध्ये लस साठवली जाणार होती, मात्र येथील काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेल येथील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला जाणार असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जालन्यातही १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार असून जिल्हा आरोग्य यंत्रणेने त्याची संपूर्ण तयारी केली आहे. जालन्यात येणारी लस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामधील शीतगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.
लसीकरणाची तयारी -
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिने कोरोनाविरोधात मुंबईकर लढा देत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकराने केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने कोरोनावरील भारत आणि सिरम या दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता दिली आहे. लस लवकरच उपलब्ध होणार म्हणून देशात आणि महाराष्ट्रात शीतगृहे उभारण्यात आली आहेत. मुख्य प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण देऊन लसीकरणासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा सराव घेण्यात आला आहे. त्यानंतर लस कधी येणार याची प्रतीक्षा असताना आज देशभरातील दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनौ, चंदीगड आदी १३ ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे.
मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत शीतगृह उभारण्यात आले आहे. या शीतगृहामध्ये एका वेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे १० लाख लसी साठवता येऊ शकतात, अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. देशभरात १३ ठिकाणी लस पाठवण्यात आल्यावर आता उद्या मुंबईत लस येणार आहे. मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धे अशा २ लाख लोकांची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन मात्रा दिल्या जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे शीतगृहामध्ये साठवली जाईल. मात्र, लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
५ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण -
मुंबई महानगरपालिकेने २७५ प्रमुख प्रशिक्षक तयार केले आहेत. त्यांच्या माध्यमातून २५०० कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ५ कर्मचाऱ्यांचे एक पथक या प्रमाणे ५०० पथके तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी ५ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे काकाणी यांनी सांगितले.
सभागृह, शाळांमध्येही होणार लसीकरण -
मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड केंद्रामध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी येत्या काही महिन्यात शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहे ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
दिवसाला किमान १४ हजार लोकांना लस -
पालिकेच्या केईएम, सायन,नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी ९ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी ७२ बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक ५ बुथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बुथवर एका शिफ्टमध्ये किमान १०० जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान १४ हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.
कांजूरच्या शीतगृहाचे काम अपूर्ण -
पालिकेने लस साठविण्यासाठी कांजूरमार्ग येथील आरोग्य केंद्राची निवड मध्यवर्ती लस साठवणूक केंद्रासाठी केली असली तरी या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार आहे,असल्याचे गोमारे यांनी सांगितले.
पंतप्रधान साधणार संवाद -
येत्या १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालिकेच्या कूपर रुग्णालयातील लाभार्थी आणि लास देणारे डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोवीन ऍप मध्ये आलेल्या अडचणी यावेळी पंतप्रधान जाणून घेणार आहेत. यासाठी पालिका प्रशासनाला टू वे व्हिडिओ कॉन्फरन्सिगची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - जालना जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामध्ये साठवणार लस