मुंबई - कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर २ जानेवारीला होणार असून त्यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
२५ जणांना लसीकरण -
ड्राय रनसाठी एका जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणी प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही, मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.
या ठिकाणी होणार ड्राय रन -
महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय येथे ड्राय रन होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, कामटी येथील ग्रामीण रुग्णालय, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्राय रन होईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गृह जिल्हा जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ड्राय रन होणार आहे. आदिवासी बहूल नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे.