मुंबई - गेल्या काही दिवसात सहा कॉरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह रुग्णालयातून गायब झाल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाच्या नातेवाईकांनी आणि किरीट सोमय्या यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यासंदर्भात सहा रुग्णांची माहिती पत्राद्वारे गृहमंत्री व आरोग्यमंत्री यांना किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
मुंबईत सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. मोठ्या संख्येने लोकांना याचा संसर्ग होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यावेळी सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेक मृतदेह गायब होत आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर ते सापडतही आहेत. आतापर्यंत मुंबईतील विविध रुग्णालयातून सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याची यादी सोमय्यांनी सादर केली. सोमय्यांच्या मते, एका 45 वर्षीय व्यक्तीचा जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटर येथून मृतदेह गायब झाला होता. तर, एकाचा केईएम हॉस्पिटलमधून मृतदेह गायब झाला होता. नंतर तो शवगृहात सापडला. याशिवाय एका महिलेचा मृतदेह सायन हॉस्पिटलमधून गायब झाला होता. तर, नायर हॉस्पिटलमधून एकाचा मृतदेह गायब झाला होता. तसेच अजून एकाचा मृतदेह गायब झाला असून, काल बोरिवली स्टेशनजवळ सापडला. यामुळे मुंबई महापालिका रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह चक्क बोरिवली स्टेशनजवळ सापडला, रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धचा थेट मृतदेहच सापडल्याने खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने मोठा प्रश्न हा आहे की, रुग्णालयातून हे आजोबा बोरिवली स्टेशनपर्यंत पोहोचलेच कसे? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.