मुंबई - मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या डिसेंबरपासून वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने रुग्णवाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा (Corona New Cases) १० हजारावर गेला आहे. मुंबईमध्ये गेले महिनाभर ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Cases in Mumbai) आढळून येत आहेत. यामुळेच मुंबईमधील रुग्णसंख्या वाढत असल्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
- तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या २० ते २५ हजारापर्यंत -
मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान पहिल्या लाटेत २८०० सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ११ हजार रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबरपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या रुग्णवाढीदरम्यान काल ४ जानेवारीला १० हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या २० ते २५ हजारापर्यंत जाऊ शकते अशी शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे. मुंबईत कोरोना आणि डेल्टा या व्हेरियंटमुळे दोन लाटा आल्या. आता ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार सुरु झाला आहे. ओमायक्रॉनचा प्रसार आधीच्या दोन लाटांपेक्षा अधिक गतीने होतो, यामुळे तिसरी लाट सुरु झाल्यानेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
- ओमायक्रॉन व्हेरियंटमुळेच रुग्णवाढ -
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालिकेने डिसेंबर महिन्यातील रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या आहेत. सातव्या फेरीमध्ये ५५ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार इतर व्हेरियंटपेक्षा अधिक गतीने होतो. यामुळे ओमायक्रॉनमुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे, रुग्णसंख्या वाढत असल्याने ही तिसरी लाट सुरु झाली असे म्हणायला हरकत नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.
- अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत २०२० च्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारी २०२२ ला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०, ८६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
- ८ लाख १८ हजार ४६२ रुग्णांची नोंद -
मुंबईत ४ जानेवारीला कोरोनाचे १० हजार ८६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ मृत्यूची नोंद झाली आहे. ६५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख १८ हजार ४६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५२ हजार १२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १६ हजार ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४७ हजार ४७६ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ११० दिवस इतका आहे. मुंबईमधील ३८९ इमारती आणि १६ झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.६३ टक्के इतका आहे.