मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोना महामारीचे संकट आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी होत असतानाच दुसरी लाट आली. ती लाटही ओसरत असताना राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचे एप्रिल महिन्यात मुंबई आणि ठाण्यात दोन रुग्ण आढळून आले होते. हे दोन्ही रुग्ण बरे झाले असून सध्या मुंबईत डेल्टा प्लस विषाणूचा एकही रुग्ण नसल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. कोरोना त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन काकाणी यांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबईत एकही रुग्ण नाही -
देशभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू आपले वेळोवेळी रूप बदलत आहे. हा विषाणू जस-जसा रूप बदलत आहे तसा त्याचा प्रभाव वाढत आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबई आणि ठाण्यात डेल्टा प्लस विषाणूचे २ रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले होते. मात्र ते दोन्ही रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत या विषाणूचा एकही रुग्ण नसल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
मुंबईत जे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी विविध विभागातील ५० रुग्णांचे सॅम्पल पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटकडे जीनोम सिक्वेन्ससाठी पाठवले जातात. या सॅम्पलचा अहवाल एक ते दीड महिन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पाठवला जातो. या चाचणीच्या अहवालामधून विषाणूमध्ये बदल झाला आहे का ? म्हणजेच त्याचे म्युटेशन झाले आहे का, याची माहिती तसेच रुग्णाला कोणत्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाली आहे. शहरात ही लागण इतरही रुग्णांना झाली आहे का, याची माहिती मिळते त्यावरून उपाययोजना करण्यात येतात असे काकाणी यांनी सांगितले.
मुंबई महापालिका सज्ज -
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान पालिकेने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड्स आणि आयसीयू ताब्यात घेतले आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेकडे सध्या एकूण २६ हजार ५९६ बेड्स आहेत. त्यातील ६ हजार बेड्स कोविड सेंटरमध्ये आहेत. गोरेगाव नेस्को येथे २ हजार बेड्स आहेत. त्याच्या बाजूलाच आणखी दीड हजार बेड्सचे नेस्को २ हे सेंटर सुरु केले जाणार आहे. यात १ हजार ऑक्सिजनचे तर ५०० साधे बेड्स असणार आहेत. भायखळ्याच्या रिचर्ड्स आणि क्रुडासमध्ये आणखी १ हजार ऑक्सिजन बेड्स वाढवले जाणार आहेत. मालाड, महालक्ष्मी, सोमैया ग्राउंड, कांजूरमार्ग याठिकाणीही जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी खास लहान मुलांसाठी हॉस्पिटल आणि कोविड सेंटरमध्ये वेगळे वॉर्ड बनवण्यात येत आहेत. त्यात सापशिडी, ल्युडो अशा गेमसह रीडिंग, हिरवळ, मनोरंजनाची व्यवस्था असेल. भिंती कार्टूनने रंगवण्यात येत आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून पालिकेकडून १२ ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट उभारले जात आहेत.
विषाणूपासून असा करा आपला बचाव -
मास्क लावा, हात सतत धुवत राहा तसेच गर्दीत जाऊ नका. ही कोरोना विषाणूपासून बचावासाठी त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीचे पालन केल्यास कोरोना, डेल्टा प्लस किंवा कोणत्याही प्रकारच्या विषाणूची बाधा नागरिकांना होऊ शकत नाही. यामुळे मुंबईकरांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.
म्युटेशन झाले का ? -
महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे, या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे, असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
काय आहे डेल्टा प्लस व्हेरिएंट ?
भारतात सर्वप्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी. १.६१७.२ या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून विषाणूचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट तयार झाला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते की नाही, हे समजून घेण्यासाठी संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणू हा वारंवार आपले रुप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. भारतातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावे देण्यात आली होती. यामधील डेल्टा स्ट्रेनचा 'डेल्टा प्लस' हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा या व्हेरिएंटवर कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता आहे.